सर्व्हर डाऊनने लसीकरणाच्या नोंदणीला विलंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:31 IST2021-04-30T04:31:09+5:302021-04-30T04:31:09+5:30
कोल्हापूर : कोरोनाची लस घ्यावयाची असल्यास त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करणे केंद्र सरकारने बंधनकारक केले आहे. मात्र, सर्व्हर डाऊन, ओटीपीसाठी ...

सर्व्हर डाऊनने लसीकरणाच्या नोंदणीला विलंब
कोल्हापूर : कोरोनाची लस घ्यावयाची असल्यास त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करणे केंद्र सरकारने बंधनकारक केले आहे. मात्र, सर्व्हर डाऊन, ओटीपीसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यास विलंब होत आहे. अठरा वर्षांतील व्यक्तींच्या नोंदणीबाबतची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही.
सरकारच्या सूचनेनुसार (www.cowin.gov.in) या संकेतस्थळावर कोरोना लस घेण्यापूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे. पण, या संकेतस्थळावर नोंदणी करताना सर्व्हर डाऊन आणि नेटवर्कची समस्या भेडसावत आहे. मोबाइल क्रमांक नोंदविल्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी आवश्यक असणारा ओटीपी मिळण्यास उशीर होत आहे. साधारणपणे एका व्यक्तीची नोंदणी करण्यास दहा मिनिटे लागतात. तांत्रिक अडचण उद्भवल्यास ही प्रक्रिया पूर्ण करण्यास २० ते २५ मिनिटे लागत आहेत. सरकारने अठरा वर्षांवरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीची नोंदणीची प्रक्रिया दि. २८ एप्रिलपासून सुरू होईल, असे सरकारकडून सांगण्यात आले होते. मात्र, अद्यापही ती सुरू झालेली नाही. शहरातील काही परिसर आणि ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केेंद्राची नावे या संकेतस्थळावर येत नाहीत. एकसारखी नावे असणाऱ्या शहरांची नोंद करताना काही गोंधळ निर्माण होत आहे. लसीकरणातील नोंदणीच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी या तांत्रिक अडचणी दूर करणे आवश्यक ठरणार आहे.
तरुणाईचा पुढाकार
ज्या व्यक्तींकडे स्मार्टफोन नाहीत. जे तांत्रिक साक्षर नाहीत. त्यांची लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी करून देण्यासाठी तरुणाईने पुढाकार घेतला आहे. केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे एनएसएसचे शंभर स्वयंसेवक योगदान देत आहे. जनसंघर्ष सेनेच्या कार्यकर्त्यांनी आवाहन केले. मदत फाउंडेशनसह विविध संघटना, व्यक्तींना लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी कशी करावी, याबाबतची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. अनेकांनी या माहितीचे स्टेटस ठेवले आहेत.
नोंदणीसाठी स्वतंत्र केंद्र करावे
४५ वर्षांवरील अनेक नागरिकांकडे स्मार्टफोन नाहीत. ऑनलाइन नोंदणी करणे त्यांना शक्य होत नाही. त्यावर पर्याय म्हणून या नोंदणीसाठी शहरातील प्रत्येक प्रभागात आणि गावांमध्ये स्वतंत्र केंद्र सुरू करावे. त्यामध्ये परिसरातील तरुण मंडळे, सामाजिक, सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी योगदान द्यावे, अशी मागणी फ्रंटलाइन वॉरिअर्स सुभाष माने यांनी गुरुवारी केली.