भगदाडाची मालिका सुरूच

By Admin | Updated: January 21, 2015 00:10 IST2015-01-20T23:59:12+5:302015-01-21T00:10:43+5:30

रंकाळ्याची अखेरची घटका : वर्षात तिसऱ्यांदा संरक्षक भिंत कोसळली

A series of breaks continued | भगदाडाची मालिका सुरूच

भगदाडाची मालिका सुरूच

कोल्हापूर : प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेला व प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे आपल्या अखेरच्या घटका मोजत असलेल्या ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या पश्चिमेकडील तटबंदीला काल, सोमवारी मध्यरात्री पुन्हा एक भगदाड पडले. वर्षभरात तिसऱ्यांदा भगदाड पडण्याचा प्रकार घडला. मात्र, महापालिकेने याकडे साफ दुर्लक्ष केल्याने रंकाळाप्रेमींत संतापाची लाट पसरली असून हिंदू युवा प्रतिष्ठानने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
दिवसेंदिवस रंकाळ्याची तटबंदी धोकादायक बनत असताना महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. निखळणारे दगड काढणे, पडलेल्या तटबंदीची दुरुस्ती करणे, नारळ्याच्या फांद्यांपासून बचाव करण्यासाठी चर मारून आरसीसी भिंत उभारण्याच्या फक्त वल्गनाच लोकप्रतिनिधींकडून सुरु आहेत. प्रत्यक्षात कृती शून्य असल्याने प्रदूषणासह पायाभूत सुविधांच्या दुर्लक्षामुळे रंकाळ्याच्या मरणकळा वाढतच आहेत.
आठ महिन्यांपूर्वी रंकाळ्याच्या कोसळलेल्या तटबंदीचे काम पैशांअभावी रेंगाळले. त्यानंतर लगेचच पंधरा दिवसांत पुन्हा तब्बल ४० फुटांपेक्षा अधिक तटबंदी कोसळली. ढासळणाऱ्या तटबंदीवर कायमचा उपाय काढण्यासाठी महापालिकेत स्थायी समिती व महासभेत फक्त चर्चा झाल्या. प्रत्यक्षात एक रुपयाचीही अद्याप तरतूद झालेली नाही. यामुळे अगोदरच मरणासन्न झालेल्या रंकाळ्याची तटबंदीही नाहीसी होण्याच्या मार्गावर आहे. पश्चिमेकडे दुरुस्ती सुरू असलेल्या तटबंदी शेजारील मोठा भाग पाण्यात कोसळला. त्यामुळे आता पांढऱ्या घाटापर्यंत तटबंदीचे दगड कोसळण्याची दाट आहे.
प्रदूषित पाणी तसेच तटबंदीजवळ असलेल्या नारळाची झाडे व भुसभुशीत जमीन यामुळेच संपूर्ण तटबंदी धोकादायक बनली आहे. उद्यानाकडील बाजूने तटबंदीचा भाग दीड ते दोन फुटांनी खचू लागला आहे. अनेक ठिकाणी तटबंदीही वेडी-वाकडी झाली आहे. एकमेकांपासून सुटत असलेले दगड काढून तटबंदी भक्कम करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे. मात्र, महापालिका प्रशासन व पदाधिकारी फक्त गप्पा व घोेषणाबाजीत रंगले आहेत.

प्रदूषणाचा धोका
रंकाळ्यात मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेतून महापालिकेला ६ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मिळाला. गेली साडेचार वर्षे ही योजना रखडली. रंकाळा टॉवर ते जुना वाशी नाका येथील ड्रेनेजसाठी पाईपलाईन पूर्ण होऊनही सांडपाणी पूर्ण क्षमतेने वहन होत नाही. परिणामी मिसळणाऱ्या सांडपाण्यामुळेच रंकाळ्याचे दुखणे वाढत आहे. दूषित पाण्यामुळे रंकाळ्याच्या पाण्यावर तेलकट तवंग साचला आहे.

सांडपाण्याचे दुखणे
शाम सोसायटी व साने गुरुजी वसाहतीतून आलेले सांडपाणी रंकाळ्यात मिसळते. केंदाळ समूळ नष्ट करण्यासाठी १५ लाख रुपये खर्च करून विव्हिल किडे सोडण्यात आले.
पण जलपर्णी कमी झाल्या नाहीत. आता मिसळणाऱ्या सांडपाण्यामुळे केंदाळाचे दुखणे पुन्हा वर काढत आहे.


उपोषणाचा इशारा
तटबंदीचा मोठा भाग कोसळून चोवीस तास उलटले तरी महापालिका प्रशासनातील एकाही अधिकारी किंवा लोकप्रतिनिधीने त्याची दाद घेतलेली नाही. महापालिका प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास १ फेबु्रवारीपासून ‘बेमुदत उपोेषण’ करणार असल्याचा इशारा हिंदू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक देसाई यांनी दिला आहे.

निव्वळ फार्स
रंकाळा तलाव संवर्धनाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी महापालिकेची खास महासभाही झाली. तीनवेळा ‘एक दिवस रंकाळ्यासाठी’ हा उपक्रमही राबविला गेला. मात्र, रंकाळा प्रदूषणप्रश्नी प्रशासन ढिम्मच आहे. संरक्षक कठड्याची पडझड व सांडपाण्यामुळे रंकाळ्याला अवकळा आली आहे. दुरुस्तीचे काम कासवगतीने सुरू आहे.


उपायांची गरज
ढासळलेल्या तटबंदीची बांधणी करणे तसेच मजबुतीकरण
झाडांच्या मुळापासून असणारा धोका कमी करणे. संपूर्ण पाणी उपसून गाळ काढणे.
अतिरिक्त झालेले पाणी बाहेर जाण्याची सोय करणे.
तटबंदीचे वयोमान संपल्याने मजबुतीकरणाची गरज.
नैसर्गिक पुनर्भरणासाठी धरण सुरक्षा संस्थेच्या तज्ज्ञांची मदत घेणे.
तत्काळ निधीची उपलब्धता करून कामास सुरुवात करणे.

Web Title: A series of breaks continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.