सोनतळी येथे लोकवर्गणीतून उभारले अलगीकरण कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:17 IST2021-06-28T04:17:11+5:302021-06-28T04:17:11+5:30
सध्या कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या आणि संभाव्य महापुराचे संकट यादृष्टीने चिखलीच्या तरुणांनी तातडीने बैठक घेऊन अवघ्या एकाच दिवसात लोकवर्गणीतून ...

सोनतळी येथे लोकवर्गणीतून उभारले अलगीकरण कक्ष
सध्या कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या आणि संभाव्य महापुराचे संकट यादृष्टीने चिखलीच्या तरुणांनी तातडीने बैठक घेऊन अवघ्या एकाच दिवसात लोकवर्गणीतून सुमारे लाख रुपयाचे साहित्य आणून कोरोना अलगीकरण कक्षाची उभारणी केली.
विविध सहकारी संस्थांची मदत आणि लोकवर्गणीतून उभारलेल्या हे अलगीकरण कक्ष पहिल्याच दिवशी अकरा रुग्णांना आधार ठरले.
प्रयाग चिखलीस जुलैमध्ये महापूर येतो. कोरोना अलगीकरण केंद्र असावे, अशी ग्रामस्थांची मागणी होती. ग्रामस्थांच्या मदतीसाठी चिखलीचे माजी सरपंच केवलसिंग रजपूत, धनाजी चौगले यांच्या संकल्पनेतून आणि रघुनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार अलगीकरण कक्षाची स्थापना करून ग्रामस्थांना दिलासा दिला आहे.
दरम्यान, उद्घाटनप्रसंगी प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी कोरोना संकटात ट्रेसिंग, लसीकरण आणि अलगीकरण यासाठी लोकांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. वडणगेचे रवींद्र पाटील यांनी बी. एच. पाटील युवा मंचच्या माध्यमातून या अलगीकरण केंद्रासाठी ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले. पं. स. सदस्य इंद्रजित पाटील यांनीही औषधे व उपयुक्त साहित्याची मदत करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी भाजपाचे संभाजीराव पाटील, धनाजी चौगले, करवीर पंचायतचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, वडणगेचे सरपंच सचिन चौगले, आंबेवाडीचे सरपंच सिकंदर मुजावर, वरणगेचे अमित पाटील, पाडळी बुद्रुकचे भिकाजी पाटील, रजपूतवाडीचे जीवनसिंग रजपूत उपस्थित होते.
फोटो ओळी :- सोनतळी येथील आश्रमशाळेत कोरोना अलगीकरण कक्षाचे उद्घाटन करताना प्रांताधिकारी वैभव नावडकर. सोबत रघुनाथ पाटील, केवलसिंग रजपूत, धनाजी चौगुले, संभाजीराव पाटील, रवींद्र पाटील, सचिन चौगले, सिकंदर मुजावर, अमित पाटील उपस्थित हाेते.