मराठा नव उद्योजकांना कर्जपुरवठ्यासाठी बँकांची स्वतंत्र बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:16 IST2021-06-19T04:16:46+5:302021-06-19T04:16:46+5:30
कोल्हापूर : कोणी कर्ज बुडवील म्हणून होतकरू मराठा उद्योजकांना बँकांनी कर्जपुरवठ्यापासून रोखू नये यासाठी बँकांची स्वतंत्र बैठक लवकरच आयोजित ...

मराठा नव उद्योजकांना कर्जपुरवठ्यासाठी बँकांची स्वतंत्र बैठक
कोल्हापूर : कोणी कर्ज बुडवील म्हणून होतकरू मराठा उद्योजकांना बँकांनी कर्जपुरवठ्यापासून रोखू नये यासाठी बँकांची स्वतंत्र बैठक लवकरच आयोजित करू असे राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी जाहीर केले. बोगस कर्जदारांना पाठीशी घातले जाणार नाही; पण पात्र असणाऱ्या लाभार्थ्याला न्यायापासून वंचित ठेवले जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कोल्हापूर विभागाची प्राथमिक बैठक शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात झाली. पुढील काळात राज्यातील ३६ जिल्ह्यांसाठी ६ विभागीय बैठका होणार आहेत. यावेळी महामंडळाचे जिल्हा समन्वयक ऋषिकेश आंग्रे यांनी कर्जयोजनांची माहिती दिली. यावर क्षीरसागर यांनी दोन्ही कर्ज योजनेत ६० टक्के अर्जदार योजनेपासून वंचित राहत असल्याने सविस्तर अहवाल देण्याची सूचना केली. यावेळी कौशल्य विकास रोजगारचे सहायक आयुक्त संजय माळी, बँक ऑफ इंडिया अग्रणी जिल्हा प्रबंधक राहुल माने, महामंडळाचे जिल्हा समन्वयक ऋषिकेश आंग्रे, जिल्हा समन्वयक सतीश माने, जिल्हा समन्वयक पुष्पक पालव, किशोर घाटगे उपस्थित होते.
चौकट
एजंटगिरी खपवून घेणार नाही
पुढील काळात महामंडळाच्या सुटसुटीत कारभाराकडे आपला कल असेल. मराठा समाजातील युवा उद्योजकांना कर्ज पुरवठा करून उद्योजकांना सक्षम करण्याचा उद्देश असून, यामध्ये कोणतीही एजंटगिरी खपवून घेतली जाणार नाही किंवा कोणी टक्केवारीने मराठा युवकांच्या हक्काचे पैसे लाटत असेल तर त्याची आपल्याशी गाठ असल्याचा इशारा त्यांनी दिला. आजपर्यंत जिल्ह्यातील किती लोकांनी अर्ज घेतले आणि त्याची सद्य:स्थिती काय आहे अशी विचारणा क्षीरसागर यांनी केली.
क्षीरसागर यांनी केलेल्या सूचना
अर्जातील त्रुटींची पूर्तता करून तात्काळ कर्जपुरवठा सुरू करा
महामंडळातर्फे मार्गदर्शन शिबिराच्या ठिकाणीच ऑनलाइन अर्ज भरण्याची यंत्रणा उभी करा.
एजंटांची साखळी मोडण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ यासारखी संकल्पना राबवा
फाेटो: १८०६२०२१-कोल-क्षीरसागर मीटिंग
फोटो ओळ : कोल्हापुरात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाची प्राथमिक बैठक शुक्रवारी शासकीय विश्रामगृहावर राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.