वस्त्रोद्योगास ‘सेनवॅट’ लागण्याच्या वृत्ताने खळबळ
By Admin | Updated: July 21, 2015 01:35 IST2015-07-21T01:35:07+5:302015-07-21T01:35:07+5:30
वस्त्रोद्योगात मोठी खळबळ

वस्त्रोद्योगास ‘सेनवॅट’ लागण्याच्या वृत्ताने खळबळ
इचलकरंजी : केंद्रीय अबकारी कर खात्याकडून ‘सेनवॅट’मध्ये दुरुस्ती करणारे परिपत्रक जारी केल्याने येथील उडाली. मात्र, करमुक्त असलेल्या वस्त्रोद्योगास पुन्हा कर लागणार नसल्याचा खुलासा केंद्रीय अबकारी कर खात्याचे सचिव अक्षय जोशी यांनी केल्याने उद्योजकांना दिलासा मिळाला.
केंद्रीय अबकारी कर खात्याचे सचिव अक्षय जोशी यांनी १७ जुलैला ३५/२०१५ क्रमांकाचे एक परिपत्रक जारी केले. परिपत्रकात अबकारी कराबाबत (सेनवॅट) नेमका अर्थ निघत नसल्याने वस्त्रोद्योगाच्या प्रत्येक टप्प्यावर ‘सेनवॅट’ लागणार, अशी अफवा पसरली, तर कापडावर प्रक्रिया करणाऱ्या प्रोसेसर्सना १२.५ टक्के अबकारी द्यावा लागणार, अशीही बातमी उठली.
दरम्यान, याबाबत अधिक चौकशी करता समजलेली माहिती अशी, टेक्सराईझ यार्न उत्पादित करणाऱ्या कारखानदारांकडून आयातीत सुतावर १२.५ टक्के कर अर्थ खात्याने लावला होता; पण वस्त्रोद्योग करमुक्त ठेवण्याचे सरकारचे धोरण असल्याने हा कर लागू पडणार नाही, असे टेक्सराईस यार्न उत्पादकांचे म्हणणे होते. अखेर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने उत्पादकांचे म्हणणे उचलून धरत आयातीत सुतावर बसविण्यात येणारा कर बेकायदेशीर ठरविला. नवीन परिपत्रकात असलेल्या मजकुरावरून नेमका अर्थ निघत नसल्यामुळे वस्त्रोद्योगास सेनवॅट लागणार, अशी अफवा पसरली. त्यामुळे जोरदार खळबळ उडाली. दरम्यान, सोमवारी रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अबकारी कर खात्याचे सचिव अक्षय जोशी यांच्याकडे अधिक चौकशी केली असता अक्षय जोशी यांनी वरीलप्रमाणे खुलासा करीत सूत किंवा कापडास सेनवॅट लागणार नाही, असे स्पष्ट सांगितले असल्याची माहिती येथील उद्योजक लक्ष्मीकांत मर्दा यांनी दिली.
रस्ते प्रकल्पाची आकडेमोड सुरू
निगेटिव्ह ग्रेडिंगवर भर : उद्या अहवाल पूर्ण होण्याची शक्यता
कोल्हापूर : रस्ते प्रकल्पाची अंतिम किंमत ठरविण्याची घाई महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागात सुरू आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या समितीला अहवाल सादर करण्यापूर्वी शुक्रवारी ‘एमएसआरडी’च्या कार्यालयात बैठक होत आहे. हा अहवाल गुरुवारपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती शहर अभियंता तथा समिती सदस्य नेत्रदीप सरनोबत यांनी दिली.
शहरातील वादग्रस्त रस्ते प्रकल्पाची अंतिम किंमत ठरविण्याचे काम महापालिकेत सुरू आहे. यासाठी नोबेल कंपनीने केलेल्या मूल्यांकन अहवालातील तपशीलाची पडताळणी पूर्ण झाली आहे.
‘ए’, ‘बी’, ‘सी’ व ‘डी’ अशी प्रकल्पातील कामाची वर्गवारी करण्यात आली आहे. ‘ए’वर्गात प्रकल्पातील पूर्ण कामे, ‘बी’ वर्गात अपूर्ण कामे, तर ‘सी’ वर्गात केलेली मात्र उपयोगात नसलेली कामे, ‘डी’ वर्गात निकृष्ट कामांचा समावेश करण्यात आला. या सर्वांचे मूल्य करून प्रकल्पाची किंमत ठरविली जाणार आहे. (प्रतिनिधी)