‘एसआयटी’चे वरिष्ठ अधिकारी कोल्हापुरात
By Admin | Updated: July 7, 2016 00:38 IST2016-07-07T00:37:26+5:302016-07-07T00:38:07+5:30
पानसरे हत्या प्रकरण : वीरेंद्र तावडेचा ताबा दोन दिवसांत शक्य; अधिकारी तळ ठोकून

‘एसआयटी’चे वरिष्ठ अधिकारी कोल्हापुरात
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी हिंदू जनजागरण समितीचा डॉ. वीरेंद्र तावडे याचा ताबा घेण्यासाठी पुणे राज्य गुन्हे अन्वेषण विभागा (एसआयटी)च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे विशेष पथक बुधवारी कोल्हापुरात दाखल झाले. हे पथक कोल्हापुरात तळ ठोकून असल्याने दोन दिवसांत डॉ. तावडेला कोल्हापूर पोलिस येरवडा कारागृहातून ताब्यात घेण्याची शक्यता आहे. डॉ. तावडेचे कोल्हापूर कनेक्शन ‘सीबीआय’च्या तपासात पुढे आले आहे. तो पानसरे हत्या प्रकरणातील ‘मास्टरमाइंड’ असल्याचा संशय पोलिसांना आहे. तावडे सध्या येरवडा कारागृहात आहे. पुणे न्यायालयाने त्याचा ताबा घेण्याची परवानगी कोल्हापूर पोलिसांना दिली आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागा (एसआयटी)चे अप्पर पोलिस महासंचालक संजयकुमार हे अमेरिकेच्या अभ्यासदौऱ्यावर गेल्याने तावडेचा ताबा घेण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली. ‘एसआयटी’ प्रमुख संजयकुमार यांनी कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधून तावडेच्या अटकेसंदर्भात चर्चा केली. ईदनिमित्त सर्व पोलिस बंदोबस्तात आहेत. शुक्रवार (दि. ८) पासून डॉ. तावडेची अटक प्रक्रिया व चौकशी प्रक्रिया राबविण्याची तयारी कोल्हापूर पोलिसांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे येथील ‘एसआयटी’चे पाच वरिष्ठ अधिकारी बुधवारी कोल्हापुरात दाखल झाले. त्यांनी सर्वप्रथम श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर रात्री उशिरा स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांची बैठक झाल्याचे समजते. हे पथक कोल्हापुरात तळ ठोकून असल्याने डॉ. तावडेचा दोन दिवसांत ताबा घेण्याची शक्यता आहे. कोल्हापूर पोलिसांनी कायदेशीर बाबींची पूर्तता केली असून, ते ज्येष्ठ विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांच्याशी संपर्कात असल्याचे सूत्रांनी सांगितले. डॉ. तावडेला अटक करून सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. (प्रतिनिधी)