‘बालगोपाल’ उपांत्य फेरीत
By Admin | Updated: April 10, 2015 00:32 IST2015-04-09T23:53:23+5:302015-04-10T00:32:59+5:30
नेताजी चषक फुटबॉल : टायब्रेकरवर ‘शिवनेरी’वर मात

‘बालगोपाल’ उपांत्य फेरीत
कोल्हापूर : बालगोपाल तालीम मंडळाने शिवनेरी स्पोर्टस् संघाचा ४-१ असा टायब्रेकरवर पराभव करीत नेताजी चषक फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत आज, शुक्रवारी बालगोपाल संघाची पारंपरिक प्रतिस्पर्धी दिलबहार (अ) संघाबरोबर लढत होणार आहे.शाहू स्टेडियम येथे गुरुवारी बालगोपाल व शिवनेरी स्पोर्टस् यांच्यात सामना झाला. प्रारंभापासून ‘बालगोपाल’कडून अक्षय कुरणे, रोहित कुरणे, महादेव तलवार, सचिन गायकवाड यांनी गोल करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेत वेगवान चाली रचण्यास सुरुवात केली. मात्र, ‘शिवनेरी’च्या सजग गोलरक्षकाने त्यांचे गोल करण्याचे इरादे फोल ठरविले. ‘शिवनेरी’कडून दीपराज राऊत, कुमार पचिंद्रे, युवराज पाटोळे, अर्जुन साळोखे, इंद्रजित पाटील, अब्दुल महात, तौसिफ बाणदार यांनीही तितक्याच जोराने प्रतिकार व विरोध करीत गोल करण्यासाठी सातत्याने खोलवर चढाया केल्या. युवराज पाटोळे, तौसिफ बाणदार, दीपराज राऊत यांच्यात योग्य समन्वय नसल्याने गोल करताना प्रत्येक खेळाडू वैयक्तिकपणे खेळतानाचे चित्र दिसले. त्यामुळे संघाला गोल करण्याच्या अनेक संधी असूनही त्यांचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. त्यामुळे पूर्वार्धात सामना गोलशून्य बरोबरीत राहिला.
उत्तरार्धात सामन्यात अक्षय कुरणे, रोहित कुरणे, महादेव तलवार, सचिन गायकवाड, जयकुमार पाटील यांनी जोरदारपणे आक्रमण केले. मात्र, ‘शिवनेरी’च्या बचावफळीपुढे त्यांचा निभाव लागला नाही. ‘शिवनेरी’कडून तौसिफ बाणदार याने मारलेला फटका गोलपोस्टला लागून बाहेर गेला. दोन्ही संघांकडून सामन्यात गोल करण्यापेक्षा बचावावर भर देत सामन्याचा निकाल टायब्रेकरकडे नेण्याचा कल अधिक दिसला. अखेरपर्यंत दोन्ही संघांनी आलेल्या संधी कॅश करण्यापेक्षा बचावावर भर दिला. त्यामुळे सामना संपूर्ण वेळेत गोलशून्य बरोबरीत राहिला. त्यामुळे मुख्य पंचांनी सामन्याचा निकाल टायब्रेकरवर लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ‘बालगोपाल’कडून सुनील मुळीक, प्रतीक पोवार, रोहित कुरणे, सचिन गायकवाड यांनी, तर ‘शिवनेरी’कडून केवळ युवराज पाटोळे याने गोल केला. दीपराज राऊत व उमेश भगत यांचे फटके वाया गेले. त्यामुळे ‘बालगोपाल’ने ४-१ असा सामना जिंकत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.