ऑक्सिजन निर्मितीत स्वयंपूर्ण भाग १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:26 IST2021-08-27T04:26:34+5:302021-08-27T04:26:34+5:30

-- दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या कोरोना या महामारीने प्रत्येकाच्या श्वासावरच हल्ला चढवला. अशावेळी गंभीर स्थितीला पोहोचलेल्या रुग्णांना जगवले ते ...

Self-sufficient part in oxygen production | ऑक्सिजन निर्मितीत स्वयंपूर्ण भाग १

ऑक्सिजन निर्मितीत स्वयंपूर्ण भाग १

--

दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या कोरोना या महामारीने प्रत्येकाच्या श्वासावरच हल्ला चढवला. अशावेळी गंभीर स्थितीला पोहोचलेल्या रुग्णांना जगवले ते ऑक्सिजनने... ऑक्सिजनचे महत्त्व सगळ्यांनाच नव्याने कळून चुकले. म्हणूनच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प बसवण्यात आले आहेत. हवेतील ऑक्सिजन शोषून घेणाऱ्या या १४ प्रकल्पांमधून १०० टन ऑक्सिजन निर्मिती होणार असून त्यापैकी चार प्रकल्प नुकतेच कार्यान्वित केले आहेत. यानिमित्ताने ऑक्सिजन निर्मितीच्या बाबतीत आता कोल्हापूर स्वयंपूर्ण बनले आहे.

----

मे २०२१... जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांना एकामागोमाग एक फाेन येऊ लागले... साहेब, आमच्या रुग्णालयात आता दोन तासच पुरेल इतका ऑक्सिजन शिल्लक आहे... ऑक्सिजनवर १५ रुग्ण आहेत... तातडीने ऑक्सिजनचे सिलिंडर पाठवा... ऑक्सिजनवर असलेल्या हजारो रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी धडपड सुरू असताना, इकडे अधिकारीच जणू व्हेंटिलेटरवर होते... कारण एकच, ऑक्सिजनचा तुटवडा. मागणीच्या निम्मा पुरवठा. जिल्ह्यात रोज ५२ ते ५६ टन ऑक्सिजन लागायचा आणि पुरवठा व्हायचा ३२ ते ३५ टन. ही कठीण परिस्थिती हाताळताना प्रशासनाच्या लक्षात आले की, ऑक्सिजन निर्मितीच्या बाबतीत लवकरच स्वयंपूर्ण बनले पाहिजे. एरवी शेवटच्या क्षणी अत्यवस्थ बनलेल्या रुग्णाला ऑक्सिजन, व्हेंटिलेटरवर ठेवले जाते. कोरोना मात्र या गृहितकाला अपवाद आहे. व्यक्ती कोणत्याही वयोगटातील असो, ऑक्सिजनची पातळी कमी व्हायला लागली की, कृत्रिम ऑक्सिजन लावण्याला पर्यायच नाही. एकाचवेळी हजारो रुग्णांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन लागण्याची ही पहिलीच वेळ होती.

जीवन म्हणजे काय? तर दोन श्वासांमधलं अंतर. जन्म आणि मृत्यूचा फेरा ठरतो, तो या श्वासावर. माणसाची श्वासोच्छवासाची क्षमता कमी झाली की, ऑक्सिजनची पातळी खालावते. अशावेळी कृत्रिम श्वासाद्वारे माणसाला जगविण्याचे काम करतो, ते ऑक्सिजन. मार्च २०२० मध्ये सुरू झालेल्या कोरोनाने आरोग्यदायी जीवनशैली आणि या श्वासाचे महत्त्व नव्याने जगाला पटवून दिले. समोर दिसणाऱ्या शत्रूला नामाेहरम करायला वेळ लागत नाही. पण इथे आपल्याला एका अदृश्य विषाणूशी लढायचे होते. प्रत्येक माणूस आपण या संसर्गापासून कसे दूर राहू, शरीरातील ऑक्सिजन पातळी कशी कमी होणार नाही, याची दक्षता घेऊ लागला. दिवसातून तीन-चार वेळा ऑक्सिमीटरवर तपासणी करूनही मनात शंकेची पाल चुकचुकलेली असायचीच. हा आजार थेट फुफ्फुसाच्या कार्यक्षमतेवरच हल्ला करतो. फुफ्फुसाला संसर्ग झाला की रुग्णाला ऑक्सिजन लावावा लागतो. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यात ६० हजार लोकांना याची लागण झाली. त्यावेळी ३२ टन ऑक्सिजनची गरज असायची. दुसऱ्या लाटेत मात्र संसर्गाची तीव्रता अधिक होती. दीड लाखावर नागरिकांना याचा संसर्ग झाला आहे. हजारो रुग्णांना ऑक्सिजनची गरज होती. एक वेळ अशी आली की, रुग्णालयांमध्ये काही तासांसाठीच ऑक्सिजन शिल्लक असायचा. तत्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई दहा-बारा दिवस ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्टवर रात्रं-दिवस तळ ठोकून असायचे. ऑक्सिजनअभावी रुग्ण दगावणे ही वेळ येऊ नये यासाठी सगळे धडपडत होते. अखेर हा कठीण काळ निभावून नेण्यात यश आले. पण यावेळी मोठा धडा मिळाला, तो म्हणजे ऑक्सिजनबाबतीत स्वयंपूर्ण बनले पाहिजे. त्याआधीच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याची कार्यवाही सुरू झाली होती.

जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह आरोग्य यंत्रणेने जोरदार काम केले. आमदार, लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय यांनी मिळून नियोजन केले आणि जिल्ह्यातील बारा तालुक्यांतील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प बसविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जिल्हा नियोजनमधून निधीची तरतूद करण्यात आली. एप्रिल महिन्यात त्याची निविदा काढण्यात आली.

Web Title: Self-sufficient part in oxygen production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.