आयसीटीईच्या ‘आयडिया लॅब’ साठी डीकेटीईची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:18 IST2021-06-20T04:18:14+5:302021-06-20T04:18:14+5:30
इन्स्टिट्युटमधून संशोधनाला आणखीन बळ मिळावे तसेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी - २०२० यामध्ये नमूद केल्याप्रमाणे प्राध्यापकांना सर्वसमावेशक शिक्षण आणि संशोधन ...

आयसीटीईच्या ‘आयडिया लॅब’ साठी डीकेटीईची निवड
इन्स्टिट्युटमधून संशोधनाला आणखीन बळ मिळावे तसेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी - २०२० यामध्ये नमूद केल्याप्रमाणे प्राध्यापकांना सर्वसमावेशक शिक्षण आणि संशोधन यासाठी चालना मिळावी यासह विविध हेतूने एआयसीटीईने आयडिया लॅबची संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे. आयडिया लॅब योजनेसाठी स्थापित राष्ट्रीय संचालन समितीने मागवलेल्या प्रस्तावांचे मूल्यांकन करून महाविद्यालयांची निवड केली आहे. एआयसीटीईचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी निवडलेल्या या ४९ इंजिनिअरिंग महाविद्यालयांमध्ये इचलकरंजीच्या डीकेटीईचा समावेश आहे. या लॅबच्या उभारणीसाठी दीड कोटीचा खर्च अपेक्षित आहे. यापैकी ५५ लाख रुपये एआयसीटीईकडून मिळणार असून उर्वरित रक्कम सहभागी ११ इंडस्ट्रीज आणि डीकेटीई यांच्या समन्वयातून उभारली जाणार आहे.
सर्व प्रकारच्या अत्याधुनिक मशिन्स जसे की, थ्रीडी स्कॅनिंग, थ्रीडी प्रिंटिंग, सीएनसी राऊटर, विविध टेस्टिंग इक्विपमेंटस अशा अनेक मशिनरींनी युक्त ही आयडिया लॅब डीकेटीईमध्ये २४ तास सर्वांसाठी उपलब्ध असणार आहे. यामुळे एकाच छताखाली कल्पनाशक्तीचे रूपांतर उत्पादनामध्ये करण्याची संधी मिळणार आहे. याचा उपयोग इचलकरंजीसह परिसरातील शाळा, कॉलेजेच्या विद्यार्थी, प्राध्यापक तसेच उद्योजकांना होईल. पंतप्रधानांना अपेक्षित ‘राष्ट्रीय शिक्षण प्रणाली-२०२०’ चे उद्दिष्ट साध्य होण्यास निश्चितच मदत होणार आहे. डीकेटीईतील आयडिया लॅब विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती, संशोधन आणि उद्योगाला चालना देणारी, अत्याधुनिक यंत्र सामग्रींनी युक्त अशी लॅब बनेल. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याकडे वाटचाल करण्यास प्रवृत्त करणारा हा उपक्रम नक्कीच सर्वांना प्रेरणादायी, मार्गदर्शक आणि संपूर्ण जीवनाला कलाटणी देणारा ठरेल, असे आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगितले. या आयडिया लॅबसाठी डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, ट्रेझरर आर.व्ही. केतकर, मानद सचिव सपना आवाडे, प्राचार्य डॉ. पी.व्ही. कडोले यांच्यासह विश्वस्तांचे मार्गदर्शन लाभले.