११ साखर कारखान्यांची ८० लाख बँक हमी जप्त
By Admin | Updated: March 7, 2015 01:01 IST2015-03-07T01:01:28+5:302015-03-07T01:01:55+5:30
सोमवारी मुंबईत सुनावणी : प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई

११ साखर कारखान्यांची ८० लाख बँक हमी जप्त
कोल्हापूर : नदी व तत्सम पाण्याचे स्त्रोतांचे प्रदूषण केल्याप्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यातील दहा आणि सांगली जिल्ह्यातील एक अशा अकरा साखर कारखान्यांची ८० लाख रुपयांची बँक हमी प्रदूषण नियंत्रण मंडळाने जप्त केली. त्यांना ‘उत्पादन का बंद करू नये, अशा नोटिसा दिल्या आहेत. उच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे अलीकडच्या काळात एकाचवेळी झालेली ही सर्वांत मोठी कारवाई आहे.
बड्या राजकीय नेत्यांचे हितसंबंध असलेल्या कारखान्यांवर कारवाई झाल्याने सहकारक्षेत्रात खळबळ उडाली. या कारवाईची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी एस. एस. डोके यांनी शुक्रवारी पत्रकारांना भीत भीत दिली.
पंचगंगा प्रदूषणप्रश्नी जाणीव जागृती व त्वरितच्या उपाययोजना व्हाव्यात यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दोन महिन्यांपूर्वी उपसमितीची स्थापन झाली. या समितीचे अध्यक्ष विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज सुरू आहे. दीड महिन्यांपूर्वी उपसमितीने जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांची पाहणी केली. त्यावेळी आप्पासाहेब नलवडे आणि ‘वारणा’ वगळता अन्य सर्व साखर कारखाने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे पंचगंगा नदीच्या प्रदूषणास जबाबदार असल्याचे निदर्शनास आले.
‘ओरिएंटल’प्रकल्प हवा प्रदूषण करत असल्याचे समोर आले. सांडपाणी प्रकल्पातील त्रुटी, प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या प्रमाणपत्रांचे नूतनीकरण न करून घेणे, अटी व नियमांचे उल्लंघन करणे आदी दोष आढळून आले.
कुंभी-कासारी, राजाराम, जवाहर, वारणा या कारखान्यांनी साखर उत्पादन युनिटमधून प्रदूषण केले आहे. त्यामुळे प्रत्येकी पाच लाखांची बँक हमी जप्त करण्यात आली. उर्वरित साखर कारखान्यांनी साखर उत्पादन, डिस्टिलरी या दोन्ही उत्पादन युनिटमधून प्रदूषण केले आहे.
त्यामुळे प्रत्येकी दहा लाखांची बँक हमी जप्त केली आहे. जलप्रदूषण नियंत्रण कायदा ७४ व हवा प्रदूषण नियंत्रण कायदा १९८१ अन्वये ही कारवाई प्रदूषण नियंत्रण मंडळाने केली आहे. बँकेकडून कारवाईची माहिती
मुख्य कार्यालयाकडून आदेश आल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधित
कारखान्यांनी ज्या बँकेत हमी दिली होती, त्या बँकेची हमी जप्त करण्याचा आदेश दिला. त्यानंतर कारखान्यांना कारवाईची माहिती कळाली. आधी जप्तीची कारवाई आणि नंतर माहिती, असे सूत्र अवलंबिल्यामुळे दबाव टाकूनही कारवाईतून सुटका करून घेणे शक्य झाले नाही.
हे आहेत कारखाने
दत्त (शिरोळ), पंचगंगा - रेणुका (गंगानगर, इचलकरंजी), जवाहर (हुपरी), दालमिया (आसुर्ले-पोर्ले, ता. पन्हाळा), भोगावती (परिते, ता.करवीर), कुंभी- कासारी (कुडित्रे, करवीर),आप्पासाहेब नलवडे (गडहिंग्लज), तात्यासाहेब कोरे वारणा (वारणानगर), छत्रपती राजाराम (कसबा बावडा), डी. वाय. पाटील (गगनबावडा), राजारामबापू (साखराळे, जि. सांगली) असे कारवाई झालेल्या साखर कारखान्यांची नावे आहेत. ओरिएंटल ग्रीन पॉवर कंपनी (गगनबावडा) सहवीज निर्मिती प्रकल्पाचाही समावेश. (प्रतिनिधी)