सीमा पाटील बांधकाम सभापती
By Admin | Updated: October 8, 2014 00:30 IST2014-10-08T00:28:13+5:302014-10-08T00:30:28+5:30
जिल्हा परिषद सभापती निवड : अभिजित तायशेटे, किरण कांबळे, ज्योती पाटील यांनाही संधी

सीमा पाटील बांधकाम सभापती
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद सभापतिपदांच्या निवडी आज बिनविरोध झाल्या. शिक्षण सभापतिपदी काँग्रेसचे अभिजित तायशेटे, समाजकल्याण सभापतिपदी किरण कांबळे, महिला व बालकल्याण सभापतिपदी ज्योती दीपक पाटील यांची, तर बांधकाम सभापतिपदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सीमा विजय पाटील यांची निवड झाली.
काँग्रेस कमिटीत पक्षनिरीक्षक आमदार रामहरी रूपनवार यांनी सकाळी अकराला सभापतिपदांच्या नावाची घोषणा केली. तत्पूर्वी, एका हॉटेलमध्ये रूपनवार यांच्यासह पी. एन. पाटील, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, माजी मंत्री जयवंतराव आवळे, प्रदेश सरचिटणीस अॅड. सुरेश कुराडे यांची बैठक झाली. यामध्ये नावे निश्चित झाली. विकास कांबळे यांना समाजकल्याण सभापतिपद मिळावे, यासाठी आमदार सा. रे. पाटील यांनी, तर किरण कांबळे यांच्यासाठी प्रकाश आवाडे आग्रही होते. महिला बालकल्याण सभापतिपद प्रमोदिनी जाधव यांना देण्यासाठी आवळे यांनी ताकद लावली होती.
दुपारी तीन वाजता शिंगणापूर येथील निवासी क्रीडा प्रशालेत उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली निवड सभा झाली. आवाडे-आवळे यांचे एकमत होत किरण कांबळे (हुपरी) यांनी बाजी मारली. महिला व बालकल्याण सभापतिपदी ज्योती पाटील (हलकर्णी) यांची, तर बांधकाम सभापतिपदी सीमा पाटील (अकिवाट) यांची निवड झाली. यावेळी आमदार सा. रे. पाटील, काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष प्रकाश सातपुते, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, माजी आमदार दिनकरराव जाधव, संजिवनीदेवी गायकवाड, जिल्हा परिषद अध्यक्ष विमल पाटील, उपाध्यक्ष शशिकांत खोत, उमेश आपटे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
काँग्रेस अडचणीत आहे, समजून घ्या
अध्यक्ष, उपाध्यक्षपदाप्रमाणे विषय समिती सभापती निवडीसाठी नेत्यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली होती. त्यामुळे नावे जाहीर केल्यानंतर नाराजी होणार हे उघड होते. त्यामुळे निरीक्षक रूपनवार यांनी सध्या काँग्रेस अडचणीत आहे, नेत्यांसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी समजून घ्यावे, काही झाले तरी सव्वा वर्षासाठीच निवडी असल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला.