सभासदांचे पाठबळ पाहून विरोधकांना पोटशूळ
By Admin | Updated: December 23, 2015 01:22 IST2015-12-23T00:51:16+5:302015-12-23T01:22:15+5:30
चंद्रदीप नरके : म्हासुर्ली येथे प्रचार सभा

सभासदांचे पाठबळ पाहून विरोधकांना पोटशूळ
कोल्हापूर : सहवीज प्रकल्प उभारल्याबद्दल सभेत कौतुक करणारे आता कर्जाचा कांगावा करीत आहेत. विरोधकांकडे बोलण्यासारखे काहीच मुद्दे नसल्याने ‘खोटे बोल, पण रेटून बोल’ हा एकच उद्योग सुरू आहे. पारदर्शक कारभारामुळे सभासदांचे मिळत असलेले पाठबळ पाहून त्यांना पोटशूळ उठल्याची टिका आमदार चंद्रदीप नरके यांनी केली.
कुंभी-कासारी साखर कारखाना निवडणूक प्रचारार्थ म्हासुर्ली
(ता. राधानगरी) येथे सभेत ते बोलत होते. नरके म्हणाले, विधानसभेचे राजकारण आपण कधीही कारखान्यापर्यंत नेले नाही, उलट आमदारकीचा उपयोग कारखान्याच्या प्रगतीसाठी केला. त्यामुळेच तेरा महिन्यांत सहवीज प्रकल्प सुरू करण्याचा विक्रम करू शकलो; पण काही मंडळी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी आरोप करीत सुटले आहेत. सहानुभूती मिळविण्यासाठी पैसे गोळा करण्याची स्टंटबाजी सुरू केली आहे; पण याला ‘कुंभी’चे सूज्ञ सभासद भीक घालणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कारखान्याचे उत्पन्न वाढले, तर सभासदांना भविष्यात जादा दर देता येईल, याच भावनेतून सहवीज प्रकल्प उभा केला. गाळप क्षमता वाढविली. पाच वर्षांत प्रकल्पाच्या संपूर्ण कर्जाची परतफेड करणार आहे. काटकसरीचा कारभार करीत गेल्या दहा वर्षांत कारखान्याची केलेली प्रगती विरोधकांच्या डोळ्यांत खुपत आहे. सभासदांनी अशा प्रवृत्तीला खड्यासारखे बाजूला करावे, असे आवाहनही आमदार नरके यांनी केले.
यावेळी माजी संचालक दगडू बोगरे, आबा रामा पाटील, आनंदा पाटील, विलास पाटील, प्रकाश दळवी, सुरेश पाटील, बाजार समितीचे संचालक सर्जेराव पाटील, ‘म्हासुर्ली’चे सरपंच राजेंद्र सावंत, दगडू चौगले, भिकाजी भित्तम, युवराज पाटील, के. डी. पाटील, ज्ञानदेव पाटील, अजित बच्चे, आर. पी. पाटील, संजय मोरे, उमेदवार, सभासद उपस्थित होते. नरके पॅनेलच्या उमेदवारांसह गवशी, म्हासुर्ली, पणोरे, गोगवे, कोदवडे, वाघुर्डे, नवलववाडी, मोरेवाडी, सावर्डे, मल्हारपेठ येथे प्रचारदौरा काढण्यात आला.