मोलकरणीने मारला डल्ला

By Admin | Updated: February 25, 2015 00:01 IST2015-02-24T23:54:25+5:302015-02-25T00:01:53+5:30

३१ लाखांची चोरी : हस्तगत फक्त १ लाख

Seduction | मोलकरणीने मारला डल्ला

मोलकरणीने मारला डल्ला

कोल्हापूर : मोलकरणीने पतीच्या संगनमताने साईक्स एक्स्टेंशन येथील घरमालकाच्या घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह किमती मोबाईल असा सुमारे ३१ लाख २५ हजार किमतीचा मुद्देमाल चोरल्याचे शनिवारी (दि. २१) उघडकीस आले. शाहूपुरी पोलिसांनी मंगळवारी या दाम्पत्यास अटक केली. संशयित मोलकरीण हेमलता राहुल कुलकर्णी (वय ३७) तिचा पती राहुल धोडोंपत कुलकर्णी (४०, दोघे रा. मथुरा अपार्टमेंट, अंबाई टँक, रंकाळा, मूळ रा. गिरडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) असे त्यांचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, उप्पल जितेंद्रकुमार शहा (३२, रा. जयभक्ती बंगला, साईक्स एक्स्टेंशन) यांची आजी आजारी असल्याने तिच्या सेवेसाठी त्यांनी नोव्हेंबर २०१३ रोजी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये नर्सिंगकरिता महिला हवी आहे, अशी जाहिरात दिली होती. त्यावरुन हेमलता कुलकर्णी हिने शहा यांना फोन केला. त्यांनी तिला बोलावून घेत महिना साडेसात हजार रुपये पगारावर कामावर घेतले. आजीची सेवा चांगल्याप्रकारे केल्याने त्यांनी तिला घरकामासाठी ठेवले. तिने सर्वांचा विश्वास संपादन केला. दरम्यानच्या काळात शहा यांचा एक लाख किमतीचा मोबाईल चोरीस गेल्याने त्यांनी या प्रकाराची माहिती शाहूपुरी पोलिसांना दिली. पोलिसांनी मोबाईल लोकेशनद्वारे माहिती घेतली असता तो राहुल कुलकर्णी वापरत असल्याचे दिसले. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने पत्नीच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. त्याला अटक केली. न्यायालयात त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली. घटनेनंतर पत्नी हेमलता पसार होती. मंगळवारी पोलिसांनी तिला अटक केली. तिने २६ आॅगस्ट २०१४ पर्यंत पती राहुल याच्या संगनमताने घरातील मोबाईल, ६० किलो चांदीचे व सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली. (प्रतिनिधी)

सराफ अटक होणार
हेमलता हिने पतीच्या मदतीने गुजरीतील ओसवाल नावाच्या सराफाला चोरीचे दागिने विकले. त्यातून मिळालेल्या पैशामध्ये त्यांनी दोन आलिशान गाड्या खरेदी केल्या. त्या पोलिसांनी जप्त केल्या. सराफालाही अटक करणार असल्याचे पो. नि. अरविंद चौधरी यांनी सांगितले.

Web Title: Seduction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.