सुरक्षारक्षक प्रकरणी सुनावणी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:30 IST2021-09-17T04:30:51+5:302021-09-17T04:30:51+5:30
आठ दिवसात अंतिम अहवाल देण्याची शक्यता लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीविरोधात सुरक्षारक्षकांनी जिल्हा प्रशासनाकडे केलेल्या ...

सुरक्षारक्षक प्रकरणी सुनावणी पूर्ण
आठ दिवसात अंतिम अहवाल देण्याची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीविरोधात सुरक्षारक्षकांनी जिल्हा प्रशासनाकडे केलेल्या तक्रारीवर गुरुवारी अंतिम सुनावणी झाली. या वेळी समितीचे सचिव शिवराज नायकवडी यांनी आदेश व कागदपत्रे निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांना सादर केले. त्यांच्याकडून पुढील आठ दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांना अंतिम अहवाल सादर होण्याची शक्यता आहे.
देवस्थान समितीकडे सुरक्षारक्षक म्हणून रुजू झालेल्या १६ सुरक्षारक्षकांपैकी ६ सुरक्षारक्षकांचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यांनी आपल्याला कायम सेवेत घ्यावे व कामगार कायद्यानुसार एवढ्या वर्षांचा फरक मिळावा यासाठी न्यायालयाने दिलेल्या निकालांचा आधार घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी या प्रकरणाची सुनावणी घेऊन अंतिम अहवाल सादर करण्यासाठी निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार कांबळे यांच्यासमोर गुरुवारी अंतिम सुनावणी झाली. या वेळी समितीच्या सचिवांनी प्रशासनाने मागणी केलेले लेखी आदेश, जबाब, कागदपत्रे, निकाल हा सगळा दस्तऐवज सादर केला. आता या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे. पुढील आठ ते दहा दिवसांत याचा अंतिम अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर होण्याची शक्यता आहे.
---
गैरकारभाराची चौकशी
शहरातील काही सामाजिक संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे देवस्थानमधील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यांनी मागणी केलेल्या सर्व प्रकरणांची माहिती घेऊन चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी संघटनांचे कार्यकर्ते व समितीच्या सचिवांची बैठक घेतली. ही बैठक उशिरापर्यंत सुरू होती.
---
Show quoted text