Second branch of the Natya Parishad in Kolhapur! | कोल्हापुरात नाट्यपरिषदेची दुसरी शाखा!
कोल्हापुरात नाट्यपरिषदेची दुसरी शाखा!

समीर देशपांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : मराठी नाट्य परिषदेची आणखी एक शाखा कोल्हापुरात स्थापन करण्यासाठी सध्या हालचाली सुरू असून, यासाठी विविध तालुक्यांतील नाट्यकर्मींशी संपर्क साधला जात आहे. नाट्यक्षेत्राशी संबंधित वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठीचे व्यासपीठ म्हणून या नव्या शाखेची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
गेली अनेक वर्षे नाट्यपरिषदेची कोल्हापूर शाखा येथे कार्यरत आहे. या शाखेचे ८५० हून अधिक सभासद आहेत. सध्या प्रसिद्ध नाट्यवितरक आनंद कुलकर्णी हे या शाखेचे अध्यक्ष आणि मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत; तर नाट्यवितरक गिरीश महाजन हे नाट्य परिषदेच्या कार्यकारिणीचे विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामीण भागातूनही नाट्यकर्मी सक्रिय झाले असून त्यांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्र शासनाच्या नाट्यमहोत्सवामध्येही या संघांची कामगिरी उल्लेखनीय ठरत आहे; परंतु ही सर्व मंडळी नाट्यपरिषदेच्या कोल्हापूर शाखेच्या वर्तुळाबाहेर असल्याचे सांगण्यात येते.
कोल्हापूरच्या नाट्यपरिषदेच्या वतीने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात नसल्याने किंवा जे उपक्रम राबविले जातात, ते केवळ नाट्यव्यवसाय वृद्धी डोळ्यांसमोर ठेवून आखले जात असल्याने याविषयी काही नाट्यकर्मींमध्ये नाराजी आहे. विद्यमान संचालक मंडळामध्ये रंगमंचावर सक्रिय असणाऱ्यांची संख्या कमी आहे. तसेच नाट्यक्षेत्रातील सर्व प्रवाहांना प्रतिनिधित्व दिसत नाही. त्या अनुषंगाने सर्वसमावेशक कार्यक्रमांचे आयोजन केले जात नाही, अशी तक्रार नव्या दमाच्या कलाकारांकडून होत आहे.
म्हणूनच स्वतंत्र नाट्यपरिषदेची शाखा स्थापन करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून हालचाली सुरू करण्यात आले आहेत. इचलकरंजी, राधानगरी, आजरा, चंदगड, हातकणंगले, शिरोळ, गडहिंग्लज या तालुक्यांमध्ये नाट्यक्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्यांकडे फॉर्मचे वितरण करण्यात आले असून, ते सध्या भरून घेण्याचे काम सुरू आहे.
सुमारे दीडशे जणांचे अर्ज संकलित केल्यानंतर मग ते नाट्यपरिषदेच्या मुख्य कार्यालयाकडे सादर करण्यात येणार असून, सर्वसाधारण सभेनंतर नव्या शाखेला मान्यता घेण्यात येणार आहे.


Web Title: Second branch of the Natya Parishad in Kolhapur!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.