बदनामीच्या खुलाशास तीन महिन्यांनी सवड
By Admin | Updated: November 26, 2014 00:23 IST2014-11-26T00:12:12+5:302014-11-26T00:23:05+5:30
शिवाजी विद्यापीठाचा कारभार : विषय शाहू व्याख्यानाचा

बदनामीच्या खुलाशास तीन महिन्यांनी सवड
कोल्हापूर : एखाद्या संस्थेच्या प्रतिमेस तडा जाईल, अशी बातमी वृत्तपत्रांत आल्यावर संबंधित संस्था तातडीने त्यासंबंधीचे म्हणणे स्वत:हून देते. शिवाजी विद्यापीठाबाबतीत अशाच स्वरूपाची माहिती ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यावर त्याचे स्पष्टीकरण करण्यासाठी मात्र विद्यापीठाला तब्बल तीन महिन्यांनी सवड मिळाली. त्यावरून विद्यापीठाच्या कामाची गती स्पष्ट होत असल्याचे दिसत आहे.
विद्यापीठ प्रतिवर्षी अनेक व्याख्यानमाला घेते. हा उपक्रम चांगला आहे. व्याख्यानमालेतील एक व्याख्यान राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीदिनी २६ जूनला येथील शिवाजी पेठेतील महाविद्यालयात झाले. या व्याख्यानासाठी विद्यापीठाने मंजूर केलेला खर्च आठ हजार. त्या महाविद्यालयाने अवघ्या दोन-अडीच हजार रुपयांत उत्तम व्याख्यान घेतले. त्याचा खर्च विद्यापीठाकडे पाठविला. खरे तर आठ हजारांची मंजुरी असताना अडीच हजारांत व्याख्यान झाले असेल तर ते चांगलेच आहे; परंतु विद्यापीठाच्या संबंधित विभागाच्या प्रमुखांनी त्यावर आक्षेप घेतला. ‘तुम्ही एवढ्या कमी पैशांत ते व्याख्यान घेतलेच कसे?’ अशी विचारणा त्यांच्याकडून झाली व बिल वाढवून देण्यासंबंधीचा सल्ला देण्यात आला. या व्याख्यानासाठी महाविद्यालयाने स्थानिक वक्ता बोलाविल्याने जास्त खर्च झाला नाही; परंतु विद्यापीठाला ते मान्य नव्हते. त्यासंबंधीची माहिती ‘लोकमत’मध्ये ८ आॅगस्टच्या अंकात ‘कुजबुज’ या सदरात प्रसिद्ध झाली. त्यानंतर विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयाकडून स्पष्टीकरण मागवून घेतले. त्या महाविद्यालयाने ‘कुजबुज’मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी शाहू व्याख्यानमालेचा दुरान्वयानेही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण केले. विद्यापीठाने १० नोव्हेंबरला म्हणजे मूळ घटना घडल्यानंतर पाच महिन्यांनी व बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर तीन महिन्यांनी त्याचे स्पष्टीकरण ‘लोकमत’ला पाठविले. ‘बातमीत नमूद केल्याप्रमाणे विद्यापीठ कोणासही अयोग्य, चुकीचा सल्ला देत नाही व दिलेला नाही. त्यामुळे ‘लोकमत’मध्ये दिलेली बातमी असत्य माहितीच्या आधारावर दिली असल्याचे दिसते,’ असे या खुलाशामध्ये विद्यापीठाने म्हटले आहे.