जिल्ह्यातील ‘माळीण’ गावांचा शोध सुरू
By Admin | Updated: August 1, 2014 00:36 IST2014-07-31T23:51:42+5:302014-08-01T00:36:50+5:30
धोकादायक गावे : ‘लोकमत’च्या वृत्तामुळे प्रशासन खडबडून जागे

जिल्ह्यातील ‘माळीण’ गावांचा शोध सुरू
पाटण : पुणे जिल्ह्यातील ‘माळीण’ गावातील दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातही ‘माळीण’सारखी कैक गावं डोंगर छाताडावर घेऊन जगत असल्याचे सविस्तर वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर जिल्ह्यातील प्रशासन खडबडून जागे झाले आहे. प्रशासनाकडून आता धोकादायक गावांची माहिती माहिती फोनवरून घेण्याचे काम सुरू झाले आहे. काही ठिकाणी प्रत्यक्ष गावांत जाऊन ग्रामस्थांच्या अडचणींची यादी तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.
पाटण तालुक्यातील निम्मी गावे डोंगरकड्यांच्या आडोशाला वसली आहेत. पावसाळ्यात त्यांच्यावर कड्याची टांगती तलवार असते. डोंगरकडेला असणारी गावे शोधून त्यांना धोका आहे का, याची शोधमोहीम तलाठ्यांमार्फत राबविली जाणार आहे. आमदार विक्रमसिंह पाटणकर यांनी डोंगरच्या आडोशाला असणाऱ्या गावांचा सर्व्हे करण्याची मागणीही केली आहे.
परळी : सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यातील काळोशी गाव गायदार कड्याच्या खाली वसले आहे. हा कडा सध्या धोकायदायक स्थितीत आहे. पोलीस प्रशासनाने गुरुवारी काळोशी गावाला भेट देऊन पाहणी केली.
गुरुवारी दुपारी एक वाजता पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काळोशी गावाला भेट देऊन पाहणी केली. ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकून लवकरच याबाबत ग्रामसभा बोलावून धोकादायक कडा हटविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. वनविभागाचे अधिकारीही उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आमचं बी गाव
डोंगराखाली हाय!
‘लोकमत’ने पाटण तालुक्यातील धोकायदायक गावांची सचित्र माहिती प्रसिद्ध केल्यानंतर अनेकांनी ‘लोकमत’च्या प्रतिनिधींशी संपर्क साधून ‘अहो, आमचं बी गाव डोंगराखाली हाय, शासन लक्ष कधी देणार? तेवढी आमच्या गावाची बातमी लावा,’ अशी मागणी केली.
तालुक्यातील विठ्ठलवाडी, झिमनवाडी, सुपुगडेवाडी, बोर्गेवाडी, म्हारवंड ही गावे चर्चेत आहेत. या गावांचा सर्व्हे पूर्वीच केला आहे. अशी तालुक्यात बरीच गावे आहेत. काही गावांचे पुनर्वसनाचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविले आहेत.
- किशोर पवार, प्रांताधिकारी, पाटण