‘सेतू’ कार्यालयाला सील

By Admin | Updated: July 21, 2015 01:02 IST2015-07-21T01:02:38+5:302015-07-21T01:02:38+5:30

प्रशासनाची कारवाई : नागरिकांच्या तक्रारीची घेतली दखल

Seal to the 'Setu' office | ‘सेतू’ कार्यालयाला सील

‘सेतू’ कार्यालयाला सील

कोल्हापूर : नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत जिल्हा प्रशासनाने सोमवारी सेतू कार्यालय सील केले. या निर्णयामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होणार असली तरी तात्पुरती सोय म्हणून शहरातील विविध भागांत असलेल्या महा ई-सेवा केंद्रांना दाखले देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना लागणारे रहिवासी दाखले, उत्पन्नाचे दाखले, डोमेसाईल यासह अन्य दाखले देण्यासाठी सेतू केंद्र स्थापन करून २०१३ रोजी हे काम खासगी ठेकेदार असलेल्या बेळगांवच्या जेनिक कॉम्प्युटर कंपनीला दिले होते. पूर्वी हे सेतू केंद्र जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात होते, परंतु इमारत बांधकामाच्या निमित्ताने ते मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात हलविण्यात आले. तेथे गेल्यापासून या सेतू केंद्राबाबत अनेक तक्रारी होत होत्या.
आवश्यक असणारी मशिनरी नसणे, पुरेसे मनुष्यबळ नसणे, स्टेशनरी उपलब्ध करून न देणे, दाखले देण्याकरिता जादा पैसे घेणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन न करणे आणि दाखले वेळेत न देणे यासारख्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे गेल्या होत्या. त्याची दखल करवीरचे तहसीलदार योगेश खरमाटे यांनी घेऊन त्यांचा ठेका रद्द करण्याची शिफारस जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याकडे केली होती. तथापि, ठेकेदाराबरोबरचा करार रद्द करण्यासाठी विशिष्ट प्रक्रिया राबवावी लागते. ती प्रक्रिया सध्या प्रशासन राबवीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी हे सेतू केंद्र सील करण्यात आले.
जिल्हा प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे शहरातील नागरिकांची गैरसोय होणार आहे. सोमवारी अनेक नागरिक या कार्यालयात गेले तेव्हा त्यांना सेतू केंद्र बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. मात्र, जिल्हा प्रशासनाने शहरातील
सर्व महा ई-सेवा केंद्रांना त्यांच्याकडे येणाऱ्या नागरिकांना तातडीने दाखले उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना दिल्या आहेत. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत पर्यायी व्यवस्थाही करण्यात येणार आहे.
पंधराशे दाखले प्रलंबित
सेतू केंद्रातील कारभाराचा फटका सर्वसामान्य लोकांना बसत आहे. पुरेशा मनुष्यबळाअभावी गेल्या दोन महिन्यांत या कार्यालयाकडून प्राप्त अर्जांपैकी १५०० हून अधिक दाखले देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांना केवळ हेलपाटे मारावे लागत आहेत.
नोटीस व दंडात्मक कारवाई
सेतू केंद्र चालविण्यास घेतलेल्या ठेकेदार जेनिक कॉम्प्युटर यांना तहसीलदार योगेश खरमाटे यांनी नोटीस दिली होती. त्यानंतर प्रांत प्रशांत पाटील यांनीही एक नोटीस दिली आहे तसेच दंडात्मक कारवाईही केली होती. तरीही कामकाजात कोणतीही सुधारणा झालेली नव्हती. त्यामुळे सोमवारी सेतू केंद्र सील करावे लागले. (प्रतिनिधी)

Web Title: Seal to the 'Setu' office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.