नाट्यगृहाचा पडदा शताब्दी वर्षात उघडणार

By Admin | Updated: December 10, 2014 23:54 IST2014-12-10T23:18:18+5:302014-12-10T23:54:40+5:30

केशवराव भोसले नाट्यगृह : महानगरपालिकेसमोर मार्चअखेर काम पूर्ण करण्याचे आव्हान

The screening of the theater will open in the centenary year | नाट्यगृहाचा पडदा शताब्दी वर्षात उघडणार

नाट्यगृहाचा पडदा शताब्दी वर्षात उघडणार

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कलारसिकतेची साक्ष देणाऱ्या आणि कोल्हापूरच्या सांस्कृतिक चळवळीचे केंद्र असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचा पडदा शताब्दी वर्षात उघडणार आहे. नाट्यगृहाचे काम पूर्ण करण्यासाठी मार्च अखेरपर्यंतची मुदत असून, महापालिकेच्यावतीने त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. याचवर्षी केशवराव भोसले यांची एकशे पंचविसावी जयंती साजरी होत असल्याने कोल्हापूरच्या नाट्य व सांस्कृतिक क्षेत्रासाठी हा दुग्धशर्करा योग असणार आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुण्याईने उभारलेल्या या ‘पॅलेस थिएटर’चे उद्घाटन १९१५ साली युवराज राजाराम महाराज यांच्या हस्ते झाले. स्वातंत्र्योत्तर काळात त्याचे ‘संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह’ असे नामकरण झाले. नाट्यगृहाचे सर्वांत पहिले नूतनीकरण झाले १९८४ साली. पुढे २००३ मध्ये ७४ लाख खर्चून पुन्हा नूतनीकरण झाले. त्यानंतर मात्र नाट्यगृहाकडे दुर्लक्षच झाले. तीन वर्षांपूर्वी अभिनेते विक्रम गोखले यांनी जाहीर टीका केल्यानंतर महापालिकेने यात लक्ष घातले आणि नाट्यगृह व खासबाग मैदानाचा २२.५० कोटींचा विस्तृत आराखडा बनविण्यात आला. शासनाने दिलेल्या दहा कोटी निधींपैकी मूळ नाट्यगृहासाठी ५.४० लाख, तर खासबाग मैदानासाठी २.९० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. एक कोेटीच्या निधीची तरतूद फक्त स्टेज, पडदे, विंगा, लाईट, साउंड सिस्टम व खुर्च्यांसाठी केली आहे.
नूतनीकरणासाठी नाट्यगृह १५ जानेवारीपासून बंद ठेवण्यात आले असले, तरी वर्क आॅर्डर निघून प्रत्यक्ष कामाला १५ मार्चपासून सुरुवात झाली. त्यावेळी कॉँट्रॅक्टरना एक वर्षात नूतनीकरण पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. आता नाट्यगृहाची अंतर्गत डागडुजी, गळती काढणे, दगडी बांधकाम मजबूत करणे, बाल्कनी ही सर्व कामे पूर्ण झाली आहेत. रंगमंचावरील नूतनीकरण संपून वातानुकूलन यंत्रणाही बसविण्यात आली आहे. सध्या स्टेज ड्रेपरी, पॅनेलिंग, सिलिंग आणि साऊंड सिस्टमचे काम सुरू आहे. खासबाग मैदानाच्या आत दगडी बांधकाम पूर्ण झाले असून, लागवड करण्यात आलेली हिरवळ (लॉन) उगवली आहे. या मैदानाच्या पडझड झालेल्या दगडी भिंती पुन्हा उभारण्यात आल्या आहेत. तसेच बाहेरच्या भिंतींच्या खाचा भरून त्यांचे मजबुतीकरण करण्याचे कामही संपत आले आहे.
मात्र, सध्या या परिसराची पाहणी केल्यानंतर हे काम मार्चअखेर पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. केशवराव भोसले यांची एकशे पंचविसावी जयंती ९ आॅगस्ट २०१५ रोजी साजरी होणार आहे. नाट्यगृहाच्या शताब्दी वर्षाला १५ आॅक्टोबर २०१५ रोजी प्रारंभ होत आहे. त्यामुळे या कालावधीपर्यंत तरी काम पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा आहे.

चार कोटी ७५ लाख खर्च
नाट्यगृहासाठी तरतूद केलेल्या निधीपैकी आजवर तीन कोटी रुपये खर्च झाले आहेत; तर खासबाग मैदानावर एक कोटी ७५ लाख रुपये खर्च झाले आहेत. नाट्यगृहाच्या साऊंड सिस्टमसाठी ८७ लाख रुपये खर्च करण्यात येत आहेत. त्यात आधुनिक पद्धतीची साऊंड सिस्टम, सादरीकरणासाठी प्रोजेक्टर आणि मेंटेनन्स यांचा समावेश आहे.


नाट्यगृहाच्या यापूर्वी झालेल्या दोन्ही नूतनीकरणांचा अनुभव फार वाईट आहे. एकदा नाट्यगृह सुरू झाले की, कामात राहिलेल्या त्रुटी पुन्हा कधीच दूर केल्या जात नाहीत. त्यामुळे भलेही जुलै-आॅगस्टपर्यंतचा वेळ लागू दे; पण नाट्यगृह परिपूर्ण व्हायला हवे. नाट्यगृह सुसज्ज झाले की, यंदाच्या वर्षी नाट्यसंमेलन कोल्हापुरात घेण्याचा प्रस्ताव आम्ही मांडणार आहोत.


खुर्च्यांसाठी ७९ लाख
नाट्यगृहातील खुर्च्यांसाठी ७९ लाखांचे टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यात कामगारांची मजुरी, खुर्च्यांचे तीन वर्षांचे मेंटेनन्स आणि पाच वर्षांची वॉरंटी यांचा समावेश आहे. सध्या नाट्यगृहाच्या अंतर्गत सजावटीचे काम सुरू आहे. खासबाग मैदानाच्या स्टेजचे नूतनीकरण होत आहे. त्यामुळे मार्चपर्यंत काम पूर्ण होईल.
- अनुराधा वांडरे (प्रकल्प अधिकारी, महापालिका)

Web Title: The screening of the theater will open in the centenary year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.