ग्रामीण मैदानी खेळ काळाच्या जाताहेत पडद्याआड
By Admin | Updated: May 6, 2015 00:15 IST2015-05-05T21:33:16+5:302015-05-06T00:15:02+5:30
मैदाने ओस : टी.व्ही., मोबाईल, व्हिडीओ गेम, कार्टुन पाहण्यातच मुले मग्न

ग्रामीण मैदानी खेळ काळाच्या जाताहेत पडद्याआड
सतीश पाटील -शिरोली -वर्षानुवर्षे चालत आलेले ग्रामीण भागातील मैदानी खेळ आधुनिकीकरणामुळे लोप पावत चालले आहेत. उन्हाळ्याच्या सुटीत ग्रामीण आणि शहरी भागातील मुले मैदानी खेळाऐवजी टी. व्ही., मोबाईल, व्हिडीओ गेम पाहण्यातच मग्न आहेत. त्यामुळे हे ग्रामीणबाज असलेले मैदानी खेळ काळाच्या पडद्याआड गेले आहेत.
मे महिन्यात उन्हाळ्याची सुटी पडली की, ग्रामीण भागात पूर्वी लहान मुले विटीदांडू, गलोरी, लगोरी, सुरपारंब्या, लपाछपी, आमरे गोट्या, कुईकुई जामीन कोण, टायर फिरविणे, भवरा, आट्यापाट्या, अबाधबी, आर मारणे हे मुलांचे खेळ, तर जेवणापाण्याने खेळणे, काचकवडी, जिबली, दोरी उड्या, लंगडी, खड्यांनी खेळणे हे मुलींचे खेळ पूर्वी खेळले जात होते. हे खेळ खेळत असताना दिवसभर गल्ली मुलांच्या आवाजाने, दंग्याने गजबजून जात होती. या खेळामुळे मुलांची शारीरिक आणि मानसिक वाढही होते आणि मुलांच्यात प्रतिकारशक्ती वाढते; पण सध्या जग बदलत आहे. या बदलत्या काळाबरोबर खेळही बदलले आहेत. मुलांच्या हातात विटीदांडू, भवरा यांच्याऐवजी मोबाईल आला आहे. मुले मोबाईलवर गेम खेळण्यातच रमत आहेत. मोबाईलबरोबरच टी.व्ही.वरील कार्टुन दिवसभर बघत बसणे, व्हिडीओ गेम यामुळे मुलांनी ग्रामीण खेळांकडे पाठ फिरविली आहे; पण या आधुनिक मोबाईल आणि टी.व्ही.मुळे मुलांच्यात न्यूनगंडाची भावना निर्माण होत आहे. मुले चिडचिडी बनत असून, त्यांच्यातील प्रतिकारशक्ती कमी होत चालली आहे. त्यामुळे मुलांनी आजही ग्रामीण खेळ खेळणे गरजेचे आहे.
ग्रामीण खेळाचा बाज नष्ट झाला आहे. मुले पाश्चात्त्य खेळ स्वीकारू लागल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. या खेळांचा जीवनाशी असलेला संबंध नष्ट होत आहे. इंटरनेट, व्हॉटस् अॅपमुळे शारीरिक व्यायाम नष्ट होऊ लागला आहे. भविष्यात मुले निष्क्रीय बनण्याची शक्यता आहे.
जुनं ते सोनंच. मुलांनी विटीदांडू, आट्यापाट्या हे खेळ खेळले पाहिजेत. आता पालकांनी स्केटिंगसारखे खेळ मुलींना शिकविण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण खेळावर क्रिकेटने अतिक्रमण केले आहे; पण ग्रामीण खेळ मुलांनी आजही खेळले पाहिजेत.
- आर. डी. पाटील, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा शारीरिक शिक्षण संघटना.
ग्रामीण भागातील खेळांमुळे मुलांचा सर्वांगीण व्यायाम होत होता; पण पाश्चात्त्य खेळांमुळे हे ग्रामीण भागातील खेळ नष्ट होत चालले आहेत. मुले तंदुरुस्त राहण्यासाठी पालकांनी पुढाकार घेऊन ग्रामीण खेळ खेळण्यास प्रवृत्त केले पाहिजे.
- एस. डी. लाड, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ.
काय केले पाहिजे
पालकांनी मुलांना मुक्तपणे खेळायला सोडले पाहिजे.
मुलांना मोबाईल देऊ नये.
सुटीत टी.व्ही.वरील कार्टुन पाहण्यास नकार द्यावा.
त्याऐवजी मैदानावर ग्रामीण खेळ खेळायला घेऊन गेले पाहिजे.