फसवणूक प्रकरणाची व्याप्ती वाढली
By Admin | Updated: August 3, 2014 01:48 IST2014-08-03T01:31:05+5:302014-08-03T01:48:49+5:30
पाच लाख हस्तगत : कोल्हापूरसह सांगली, सातारा येथील तरुणांना गंडा घातल्याची शक्यता

फसवणूक प्रकरणाची व्याप्ती वाढली
कोल्हापूर : पैसे दामदुप्पट करून देतो, असे सांगून कौलगे (ता. कागल) येथील तरुणाची सुमारे १८ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या संशयित महिला पोलीस कॉन्स्टेबलसह चौघा आरोपींकडे पोलीस कसून चौकशी करीत आहेत.
मुख्य सूत्रधार सागर भोसले याचे रॅकेट कोल्हापूरसह सांगली, सातारा या ठिकाणी पसरले आहे. त्यांनी आणखी कितीजणांना गंडा घातला आहे, याची माहिती पोलीस घेत आहेत. त्यांनी वाटून घेतलेल्या रकमेपैकी
पाच लाख रुपये आतापर्यंत हस्तगत केले आहेत. फरार संशयित जगताप याचा शोध सुरू आहे, अशी माहिती तपास अधिकारी गजेंद्र पालवे यांनी दिली.
पैसे दामदुप्पट करून देतो, असे सांगून कौलगे येथील पांडुरंग मारुती पाटील या तरुणाकडून १८ लाख रुपये घेऊन
फसवणूक केल्याप्रकरणी करवीर
पोलिसांनी संशयित महिला कॉन्स्टेबल नाझनीन अजिज देसाई, मुख्य सूत्रधार सागर शरद भोसले, सुनीता दादासो खवरे, महावीर लक्ष्मण कांबळे या चौघांना काल, शुक्रवारी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपींची आज दिवसभर कसून चौकशी केली. त्यांच्या राहत्या घरांचीही झडती घेतली. आरोपींनी १८ लाख रुपये आपसात वाटून घेतले होते. त्यापैकी काहींनी पैसे खर्च केले, तर काहींनी नातेवाईक व मित्रांकडे रक्कम ठेवण्यास दिली आहे. त्यापैकी पाच लाख रुपये हस्तगत केले असून, उर्वरित रक्कम जप्त करण्याचे काम सुरू आहे.
सागर भोसले याचे मोठे रॅकेट असून कोल्हापूरसह सांगली, सातारा येथील तरुणांना त्यांनी गंडा घातल्याची शक्यता आहे. फरार जगताप याचे संबंध
भोसले याच्याशी आहेत. त्याच्या मागावर पोलीस आहेत.
दरम्यान, या सर्व आरोपींचे मोबाईल कॉल तपासले जात आहेत. फिर्यादी पांडुरंग पाटील याने अकरा नातेवाइकांकडून थोडे-थोडे पैसे घेऊन १८ लाख रुपये जमा केले होते. ते सर्व नातेवाईक आज करवीर पोलीस ठाण्यात आले होते. त्यांचे पोलिसांनी जबाब घेतले. (प्रतिनिधी)