‘मनपा’ शाळांना सेमी इंग्रजीचा दर्जा
By Admin | Updated: August 18, 2015 00:51 IST2015-08-18T00:51:15+5:302015-08-18T00:51:15+5:30
सतेज पाटील : शैक्षणिक दर्जा उंचाविण्याचा निर्धार; पाच हजार विद्यार्थ्यांना मोफत बूट वाटप

‘मनपा’ शाळांना सेमी इंग्रजीचा दर्जा
कोल्हापूर : यापुढील काळात महानगरपालिके च्या प्राथमिक शिक्षण मंडळाकडील सर्व शाळा या सेमी इंग्रजी करण्यात येतील आणि या शाळांची स्पर्धा ही नामवंत अशा इंग्रजी माध्यमांशी राहील, असे आश्वासक प्रतिपादन माजी मंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी येथे बोलताना केले. शिक्षण मंडळाच्या सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांना मोफत बूट वाटप समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर वैशाली डकरे होत्या.
नगरसेवक संजय मोहितेप्रेमी, साईक्स एक्स्टेशन ग्रुप व रोटरी सनराईज सोशल सेंटर, रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर सनराईज यांच्यावतीने या समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी पाच हजार विद्यार्थ्यांना बूट व सॉक्स भेट देण्यात आले. उर्वरित पाच हजार विद्यार्थ्यांना सप्टेंबर महिन्यात वाटप केले जाणार आहे. नगरसेवक मोहिते यांनी लोकवर्गणीतून महापालिकेच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांना बूट देण्याचा संकल्प केला आहे.
महानगरपालिकेत नेहमी कुरघोडीचे राजकारण असते पण असे राजकारण न करता सभापती असताना संजय मोहिते यांनी एक चांगले काम करण्याचा संकल्प केला. निधी नसतानाही त्यासाठी प्रयत्न करत राहिले आणि आज त्यांच्याच संकल्पनेतून मनपाच्या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत बूट आणि सॉक्स मिळत आहेत, ही एक चांगली गोष्ट आहे, असे सांगून सतेज पाटील म्हणाले की, या पुढच्या काळात मनपाच्या सर्व शाळा इंग्रजी माध्यमाच्या करण्याचा आमचा संकल्प राहील. या शाळांची स्पर्धा ही प्रामुख्याने नामवंत इंग्रजी शाळांबरोबर राहील. खासगी काळा कितीही वाढल्या तरी मनपाच्या शाळा टिकविणे हे आव्हान असून ते आम्ही स्वीकारून काम करणार आहोत.
सतेज पाटील यांनी या उपक्रमास पन्नास हजार रुपयांची मदत डी. वाय. पाटील कला क्रीडा शैक्षणिक ट्रस्टमधून देण्याची घोषणाही यावेळी केली.
उद्योगपती घन:शाम भाई युवाभारत यांनी महापालिकेच्या सर्व शाळा या शांतिनिकेतनच्या दर्जाच्या करण्याचा निर्धार केला. पुढील पाच वर्षांत या सर्व शाळा ‘पीपीपी’ माध्यमातून खासगी शाळांच्या तोडीस तोड अशा बनविल्या जातील, असे ते म्हणाले.
याप्रसंगी महापौर वैशाली डकरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नगरसेवक राजेश लाटकर, रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर सनराईजचे चेअरमन केदार कुंभोजकर, रोटरी सनराईज सोशल सेंटरचे चेअरमन रवी संघवी, शिक्षण मंडळ उपसभापती भरत रसाळे, समीर घोरपडे यांची भाषणे झाली.
या समारंभास व्ही. बी. पाटील, रोहिणी काटे,अशोक पोवार, रावजीभाई पटेल, किशोर पारखी, सुनील चव्हाण आदी उपस्थित होते. शिक्षण मंडळाचे सभापती महेश जाधव व माजी सभापती संजय मोहिते यांनी सर्वांचे स्वागत केले.
उर्वरित विद्यार्थ्यांना सप्टेंबरमध्ये बूट
उर्वरित पाच हजार विद्यार्थ्यांना सप्टेंबर महिन्यात बूट वाटप करण्यात येणार आहे.
नगरसेवक संजय मोहिते यांचा लोकवर्गणीतून बूट देण्याचा संकल्प
वाढत्या खासगी शाळांमुळे मनपाच्या शाळा टिकविण्याचे आव्हान आहे.
डी. वाय. पाटील कला, क्रीडा, शैक्षणिक ट्रस्टतर्फे बूट वाटपाच्या उपक्रमासाठी ५० हजार रुपयांची मदत जाहीर
येत्या पाच वर्षांत महापालिकेच्या सर्व शाळा शांतिनिकेतनच्या दर्जाच्या बनविण्याचा निर्धार उद्योगपती घन:शाम भाई युवाभारत यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)