जिल्ह्यातील शाळा आज बंद राहणार

By Admin | Updated: July 4, 2016 00:51 IST2016-07-04T00:51:42+5:302016-07-04T00:51:42+5:30

शिक्षण बचावचे आंदोलन : जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, धरणे आंदोलन

Schools in the district will be closed today | जिल्ह्यातील शाळा आज बंद राहणार

जिल्ह्यातील शाळा आज बंद राहणार

कोल्हापूर : प्रलंबित मागण्यांच्या मान्यतेसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समिती व शैक्षणिक व्यासपीठातर्फे आज, सोमवारी जिल्ह्यात ‘शाळा बंद’ आंदोलन पुकारले आहे. समिती व व्यासपीठातर्फे सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. शिवाय धरणे आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती शैक्षणिक व्यासपीठाचे सभाध्यक्ष एस. डी. लाड यांनी दिली.
वीस पटाच्या आतील शाळा बंद करू नयेत. शाळा तेथे मुख्याध्यापक असलाच पाहिजे. सन २०१५-१६ च्या संचमान्यतेला स्थगिती द्यावी. शिक्षक भरतीस परवानगी देऊन भरती प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच असावी, अशा विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. तसेच शासनाकडून काही अशैक्षणिक निर्णय घेतले जात आहेत. त्याच्या निषेधार्थ समिती व व्यासपीठाने पुन्हा आंदोलन पुकारले आहे. यातील पहिला टप्पा म्हणून आज, सोमवारी शाळा बंद आंदोलन केले जाणार आहे. सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र हायस्कूल, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका चौक, सीपीआर, व्हीनस कॉर्नर, जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चाचा मार्ग आहे. मोर्चात माध्यमिक, उच्च माध्यमिक, खासगी, प्राथमिक अशा सुमारे १८०० शाळांमधील ३० हजारांहून अधिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक सहभागी होतील. दरम्यान, या ‘बंद’ची माहिती शाळांनी शनिवारी (दि. २) विद्यार्थी, पालकांसह विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांना दिली
आहे. (प्रतिनिधी)
शिक्षणमंत्र्यांना पत्र
या शाळा बंद आंदोलनाची जिल्ह्यातील शाळा आणि शिक्षण उपसंचालकांना लेखी पत्राद्वारे माहिती दिली असल्याचे लाड यांनी सांगितले. ते म्हणाले, या आंदोलनाबाबतचेपत्र शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना २५ जूनला पाठविले आहे. याद्वारे मोर्चा, धरणे आंदोलनानंतर प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास दि. १५ जुलैपासून बेमुदत शाळा बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तसेच प्रलंबित मागण्या मान्य होईपर्यंत राज्यात ‘शिक्षण बचाव लढा’ सुरूच राहणार असल्याचे कळविले आहे.

Web Title: Schools in the district will be closed today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.