चौगुले शाळेत मुख्याध्यापिकेची आत्महत्या
By Admin | Updated: May 8, 2014 12:11 IST2014-05-08T12:11:58+5:302014-05-08T12:11:58+5:30
संस्था पदाधिकार्यांनी त्रास दिल्याचा पतीचा आरोप; कार्याध्यक्षांनी आरोप फेटाळला

चौगुले शाळेत मुख्याध्यापिकेची आत्महत्या
कोल्हापूर : शाहूपुरी व्यापारपेठेतील आंतरभारती शिक्षण मंडळाच्या वसंतराव चौगुले विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या दत्तात्रय जाधव (वय ५५, रा. सुभेदार रामजी आंबेडकरनगर, विचारेमाळ) यांनी आज (बुधवार) सकाळी साडेनऊच्या सुमारास शाळेमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसले तरी जाधव यांनी संस्थेच्या एका पदाधिकार्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप पती दत्तात्रय जाधव यांनी पोलिसांकडे केला. दरम्यान, आंतरभारती शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष बाबूराव मुळीक यांनी हा आरोप फेटाळून लावला असून त्यांचे पती व काही दुखावलेले शिक्षक विनाकारण संस्थेवर आरोप करत असल्याचे म्हटले आहे. या घटनेमुळे शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली असून याप्रकरणाचा शाहूपुरी पोलीस कसून तपास करत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, आज आंतर भारती शिक्षण मंडळाच्या तीन प्राथमिक शाळांची कार्यशाळा वि. स. खांडेकर प्रशाळेमध्ये आयोजित केली होती. त्यानुसार सर्व शिक्षक-शिक्षिका सकाळी साडेसातच्या सुमारास शाळेत हजर होते. कार्यशाळेला उपस्थित राहणार्या वक्त्यांच्या स्वागताची जबाबदारी मुख्याध्यापिका विद्या जाधव यांच्याकडे सोपविण्यात आली होती. त्यामुळे सकाळी येताना त्यांनी गुलाबाची फुले खरेदी केली. शिक्षिका शीलाताई शिवाजीराव कांबळे ह्या त्यांच्यासोबत होत्या. शाळेत आल्यानंतर सर्व शिक्षकांचे वक्तांचे त्यांनी हसतमुखाने स्वागत केले. प्रगती पुस्तकावरही सह्या केल्या. स्वागत समारंभ झाल्यानंतर वि. स. खांडेकर प्रशालेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वसंतराव चौगुले विद्यालयाच्या कार्यालयातून पर्स घेऊन येतो म्हणून त्या शिपाई अनुराधा शहाणे यांच्याकडून शाळेच्या कार्यालयाची चावी घेऊन गेल्या. कार्यक्रम सुरू होऊनही बाई कुठे आल्या नाहीत म्हणून सर्वजण शोधाशोध करू लागले. त्या शाळेच्या कार्यालयात गेल्याचे समजताच दोन शिक्षिका व शिपाई बोलाविण्यासाठी गेले. चौगले विद्यालयाची दुमजली इमारत जुनी आहे. पहिल्या मजल्यावर कार्यालय असून दुसर्या मजल्यावर शाळा आहे. कार्यालयाचा दरवाजा बंद होता तर दुसर्या मजल्यावर जाणार्या जिन्याचा दरवाजा खुला असल्याने सर्वजण वरती गेले असता आतील वर्गाच्या खोलीमध्ये सिलिंग फॅनला त्या लटकताना दिसल्या. हा प्रकार पाहून कर्मचार्यांना हबकीच बसली त्यांनी आरडाओरड केली. अन्य शिक्षकांनी शाळेकडे धाव घेत जाधव यांना खाली उतरविले. त्यानंतर तातडीने सीपीआरमध्ये आणले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनास्थळी पर्स खुर्चीवर ठेवलेली होती. त्यामध्ये दोन डायर्या होत्या तर पांढर्या रंगाची ओढणी टेबलवर पडली होती. एक खुर्ची खाली पडली होती. सिलिंग फॅन पूर्णपणे वाकला होता. वह्या-पुस्तके अस्ताव्यस्त विस्कटली होती. रिकामी पाण्याची बाटली खाली पडली होती. त्यांच्या समोरच्या फळ्यावर ‘किलबिल किलबिल रोज चालते, विश्व उद्याचे इथे चिवचिवते’ हा सुविचार लिहलेला होता. हे सर्व दृश्य पाहून शिक्षक व जमा झालेले नागरिक हळहळले. जाधव यांनी खुर्चीवर चढून ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. आज सकाळपासून प्रसन्न चेहर्याने जाधव या कार्यक्रमस्थळी वावरत होत्या. त्यामुळे त्या आत्महत्या करतील असे कोणाला स्वप्नातदेखील वाटले नव्हते. या प्रकरणाची शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार के. एस. इंगळे करत आहेत. मनाची तयारी घरातूनच विद्या जाधव या शाळेमध्ये साडी नेसून आल्या होत्या. त्यांनी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ती ओढणी आली कुठून, त्यांनी येताना पर्समधून ओढणी आणली असावी. त्यामुळे शाळेत गेल्यानंतर जीवन संपविण्याची मनाची तयारी त्यांनी घरामधून येतानाच केली असावी, अशी चर्चा घटनास्थळी होती. उच्चशिक्षित कुटुंब विद्या जाधव यांचे पती सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांची दोन मुले इंजिनिअर तर दोन मुली वैशाली व चारूशिला डॉक्टर (एम.डी) आहेत. विद्या जाधव यांनी ३२ वर्षे सेवा केली. संपूर्ण कुटुंब उच्चशिक्षित असताना त्यांनी आत्महत्येचा विचार मनामध्ये आणला कसा? याबाबत घटनास्थळी चर्चा सुरू होती. आतापर्यंत चार जणांचे बळी चौगुले विद्यालयात शिक्षक म्हणून काम करणारे कांबळे, मुल्ला व शिपाई लोखंडे या कर्मचार्यांनी यापूर्वी अशाच कारणांतून आत्महत्या केल्या आहेत. अशा घटना होत असताना सेवकांच्या प्रश्नांकडे संस्थाचालक लक्ष देत नाहीत. जबाबदारी कोणीच घेत नसल्याने जाधव यांनीही आत्महत्या केली, अशा संतप्त प्रतिक्रिया शिक्षकांनी सीपीआरच्या शवगृहाबाहेर व्यक्त केल्या. (प्रतिनिधी)