चैनीसाठी शाळकरी मुलांचा ‘प्रताप’

By Admin | Updated: December 24, 2014 00:20 IST2014-12-23T23:58:49+5:302014-12-24T00:20:09+5:30

मोटारसायकलींची चोरी : उच्चभू्र घराण्यांतील पाचजणांचे कृत्य

School students 'Pratap' | चैनीसाठी शाळकरी मुलांचा ‘प्रताप’

चैनीसाठी शाळकरी मुलांचा ‘प्रताप’

कोल्हापूर : चैनीसाठी व गाडी फिरविण्याची हौस भागविण्यासाठी शहरात मोटारसायकलींची चोरी करणाऱ्या उच्चभ्रू घराण्यांतील पाच शाळकरी मुलांना राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी दोन गाड्यांची चोरी केल्याची कबुली दिली आहे.
नववी व दहावीच्या वर्गांत शिकणाऱ्या या पाच विद्यार्थ्यांची टोळी असून, ते चैनीसाठी मोटारसायकली चोरत असल्याची माहिती खबऱ्याद्वारे सहायक फौजदार राजू वरक यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी त्या विद्यार्थ्यांवर पाळत ठेवली असता हे विद्यार्थी घरातून बाहेर पडल्यानंतर वेगवेगळ्या मोटारसायकलवरुन शहरात फेरफटका मारत असताना दिसून आले. त्यानंतर रात्री घरी जाताना ते पुन्हा त्या बोळात किंवा हायस्कूलच्या पटांगणावर ती वाहने लावून जात असत. सहायक फौजदार वरक यांना खात्री होताच त्यांनी संशयित पाच विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. ही सर्व मुले राजारामपुरी सातवी गल्ली, तस्ते गल्ली, मंगळवार पेठ, उमा टॉकीज परिसर, बागल चौक, सासने कॉलनी व कळंबा या परिसरातील राहणारी आहेत. (प्रतिनिधी)


एकदा सुटल्याने टोळीच बनवली
सहा महिन्यांपूर्वी दहावीत शिकणाऱ्या मुलाने राजारामपुरी येथून मोटारसायकल चोरली होती. त्यावेळी त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली होती; परंतु गाडीमालकाने मुलाच्या शैक्षणिक भविष्यावर परिणाम होऊ नये म्हणून तक्रार दिली नाही. त्यामुळे पोलिसांनी समज देऊन त्याला सोडून दिले होते. त्यानंतरही त्या मुलामध्ये सुधारणा झाली नाही. त्यानंतर पाचजणांची टोळी बनवून धूम स्टाईलने मोटारसायकली चोरण्याचे ते नियोजन करीत असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली.


आई-वडिलांना मानसिक धक्का
आपला मुलगा चोऱ्या करतो, असा स्वप्नातही विचार न करणाऱ्या आई-वडिलांना राजारामपुरी पोलीस ठाण्यातून तसा फोन गेल्यानंतर धडकीच भरली. पोलीस ठाण्यात आल्यानंतर मुले माना खाली घालून उभी असल्याचे पाहून ‘असे दिवे लावतील असं वाटलं नव्हतं,’ असे म्हणून त्यांनी आपल्या मुलांची चांगलीच कानउघाडणी केली. त्यानंतर न्यायालयासमोर हजर करून घरी सोडण्यात आले.


यांच्या चोरल्या गाड्या
प्रमोद बळवंत खाडिलकर (वय ५३, रा. अंबाई टँक) यांची मोपेड (एमएच ०९ बीएल ६०९९) त्यांचा मुलगा अथर्व दि. १७ डिसेंबर २०१४ रोजी सकाळी सातच्या सुमारास राजारामपुरी सहावी गल्ली येथील श्रीराम विद्यालयासमोर लावून क्लासला गेला होता. यावेळी त्याने मोपेडला चावी तशीच ठेवली होती. या संधीचा फायदा घेत त्यांनी गाडी उचलली. त्यानंतर यामाह मोटारसायकल (एमएच ०९ सीएक्स ४६६५) ही सुनील वसंत कुबेर (सन्मित्र हौसिंग सोसायटी, काटकर माळ) येथील असल्याचे स्पष्ट झाले.

Web Title: School students 'Pratap'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.