शाळा २ फेब्रुवारीपासून बेमुदत बंद

By Admin | Updated: January 19, 2015 23:59 IST2015-01-19T23:56:41+5:302015-01-19T23:59:57+5:30

तिसऱ्या टप्प्यांतील आंदोलन : दहावी, बारावीच्या परीक्षांवर बहिष्काराचा इशारा

The school is stopping idle since 2 February | शाळा २ फेब्रुवारीपासून बेमुदत बंद

शाळा २ फेब्रुवारीपासून बेमुदत बंद

कोल्हापूर : शिक्षक भरतीवरील बंदी उठविण्यासह विविध मागण्या पूर्ण करण्यासंंबंधी शासन उदासीन आहे. त्यामुळे २ फेब्रुवारीपासून माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा बेमुदत बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे सभाध्यक्ष एस. डी. लाड यांनी शिवाजी पार्कवरील विद्याभवन येथे आज, सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. मागण्यांबद्दल सकारात्मक कार्यवाही न झाल्यास दहावी, बारावी परीक्षांवर बहिष्कारही टाकणार असल्याचे त्यांनी सांगितले. लाड म्हणाले, शासनाने २ मे २०१२ पासून शिक्षक भरतीवर बंदी आणली आहे. त्यामुळे अनेक शिक्षण संस्थेत शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम गुणवत्ता वाढीवर होत आहे. २३ आॅक्टोबर २०१३ रोजी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर सेवकांसाठी सुधारित आकृतिबंध लागू झाला. हा आकृतिबंध अन्यायकारक आहे. सध्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन नियमानुसार करावे, शालेय शिक्षण विभागाचे महसूल विभागात विलीनीकरण करणारे शासनाचे आदेश तातडीने रद्द करावेत, वेतनेतर अनुदान सर्वांना पूर्वीप्रमाणे मिळावे, डी.एड्. व बी.एड्. झालेल्यांना पुन्हा ‘टीईटी’ देण्याची अट रद्द करावी, आदी मागण्या आहेत. या मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करूनही शासनाने याकडे दुर्लक्ष केले. ६ जानेवारीला संस्थाचालक, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर, यांनी काळ्या फिती लावून काम केले. याशिवाय मागण्या मान्य होईपर्यंत शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, विभागीय एस.एस.सी. व एच.एस.सी. बोर्ड यांनी बोलाविलेल्या सर्व बैठकींवर बहिष्कार टाकून असहकाराचे आंदोलन केले. १३ जानेवारीला एक दिवस सर्व माध्यमांच्या अनुदानित, विनाअनुदानित, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. त्यानंतर शिक्षणमंत्री यांनी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. मागण्या पूर्ण करण्यासंबंधी आश्वासन दिले. परंतु, लेखी हमी मागितली असता ती मिळली नाही. त्यामुळे
२ फेब्रुवारीपासून शाळा बंद आंदोलन करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेस राज्य मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष डी. बी. पाटील, के. बी. पोवार, व. ज. देशमुख, प्रभाकर आरडे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.


शासकीय शाळा बंदमध्ये नाहीत...
२ फेब्रुवारीला होणाऱ्या शाळा बंद आंदोलनात शासकीय माध्यमिक, उच्च माध्यमिक, जिल्हा परिषदेच्या शाळा सहभागी होणार नाहीत. रयत आणि विवेकानंद शाळांनी बंद संंबंधी अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. यामुळे या दोन संस्था बंदमध्ये सहभागी होणार किंवा नाही, याबद्दल संभ्रम आहे. खासगी माध्यमिक, उच्च माध्यमिक जिल्ह्यातील ७५० शाळा बंद राहणार आहेत.

Web Title: The school is stopping idle since 2 February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.