करवीर पंचायत समिती घेणार स्कॉलरशिप सराव परीक्षा
By Admin | Updated: December 11, 2014 00:03 IST2014-12-10T19:59:36+5:302014-12-11T00:03:47+5:30
पाच हजार विद्यार्थी परीक्षा देणार : शिक्षणाच्या गुणवत्तेचा झेंडा फडकविण्यासाठी उपक्रम; परीक्षेची तयारी सुरू

करवीर पंचायत समिती घेणार स्कॉलरशिप सराव परीक्षा
कसबा बावडा : शिक्षणाच्या गुणवत्तेचा झेंडा सर्वत्र फडकविण्यासाठी आणि जिल्ह्यात तालुक्याचे आदर्श नाव होण्यासाठी करवीर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने इयत्ता चौथी आणि सातवीची जानेवारी व फेब्रुवारीमध्ये स्कॉलरशिपची सराव परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची तयारी गेल्या काही दिवसांपासून सुरू झाली आहे. सुमारे पाच हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार असून, शिक्षक शनिवारी आणि रविवारी जादा तास घेत आहेत.
मार्च २०१५ मध्ये चौथी व सातवीची स्कॉलरशिपची परीक्षा होणार आहे. या परीक्षेमध्ये आपल्या तालुक्याने नाव करावे यासाठी अनेक तालुके धडपडताना दिसत आहेत. यात करवीर तालुक्याने मात्र काहीशी आघाडी घेतल्याचे दिसते. दैनंदिन शाळांच्या वेळाव्यतिरिक्त सकाळी ७ ते १० व सायंकाळी ५ ते ७ या वेळेत स्कॉलर परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे जादा तास घेण्यात येऊ लागले आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या पाल्यांशी याबाबत शिक्षक चर्चा करीत आहेत. अभ्यास कसा करायचा, पेपर कसा सोडवायचा, मुलांचे खेळ, त्यांचा आहार, आदींबाबत पालकांना मार्गदर्शन करण्यात येऊ लागले आहे.
तालुक्यात १८५ शाळा आहेत. या शाळांमध्ये १२२६ शिक्षक आहेत, तर विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ३० हजारांच्या घरात आहे. मार्च २०१५ मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी चौथीच्या स्कॉलरशिपसाठी तीन हजार विद्यार्थी, तर सातवीच्या स्कॉलरशिपसाठी दोन हजार विद्यार्थी बसणार आहेत. यंदा तुलनेत विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. विद्यार्थ्यांच्या बरोबरोबरच पालकांनाही आपल्या मुलाने स्कॉलरशिप परीक्षेला बसावे, असे वाटत आहे. त्यामुळे मुलांचा अभ्यास घरी घेताना पालक दिसत आहेत.
सुजलाम्-सुफलाम् करवीर तालुका शैक्षणिकदृष्ट्या नेहमीच आघाडीवर राहावा यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्र भालेराव तसेच समितीच्या सभापती पूनम महेश जाधव व समितीचे सर्व सदस्य प्रयत्नशील आहेत. (प्रतिनिधी)
स्कॉलरशिप परीक्षेला प्रतिसाद
तालुक्यातील चौथी आणि सातवीची एकूण पाच हजार मुले जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होणारी सराव स्कॉलरशिप परीक्षा देणार आहेत. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांची तयारी दिसून येणार आहे. या सराव परीक्षेमुळे जास्तीत जास्त मुले मुख्य परीक्षा पास होण्यास मदत होणार आहे.
- आर. जी. चौगले, गटशिक्षण अधिकारी, करवीर पंचायत समिती.