विद्यापीठाच्या आॅक्टोबर परीक्षांचे वेळापत्रक
By Admin | Updated: August 12, 2014 00:46 IST2014-08-12T00:45:17+5:302014-08-12T00:46:18+5:30
अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू : विविध अभ्यासक्रमांच्या होणार ४६० परीक्षा

विद्यापीठाच्या आॅक्टोबर परीक्षांचे वेळापत्रक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाकडून विविध अभ्यासक्रमांच्या आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ४६० परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यातील परीक्षांना दि. २९ आॅक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुुरू झाली आहे.
विद्यापीठाने प्रथम वर्षाच्या परीक्षा महाविद्यालयांकडे सोपविल्या आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरून देण्याच्या सूचना महाविद्यालय आणि विद्यापीठातील अधिविभागांना परीक्षा विभागाकडून देण्यात आल्या आहेत. विनाविलंब शुल्क अर्ज करण्याची मुदत दि. ६ सप्टेंबरपर्यंत, विलंब शुल्कासहित दि. १३ सप्टेंबर, तर अतिविलंब शुल्कासहित दि. २० सप्टेंबरपर्यंत आहे. दि. २९ आॅक्टोबरपासून सुरू होणाऱ्या परीक्षा डिसेंबर अखेरपर्यंत चालणार आहेत. यात सत्र एक ते पाचपर्यंतचा समावेश आहे. परीक्षेसाठी बैठक व्यवस्था भिन्न विद्याशाखेच्या आणि सत्राच्या एका बाकावर दोन विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यास परीक्षा मंडळाने मान्यता दिली आहे.
परीक्षेबाबत महाविद्यालये, विद्यार्थ्यांना सूचना
डीयुडीसी प्रणालीत जे अभ्यासक्रम समाविष्ट आहेत. त्यांचे परीक्षा अर्ज विद्यापीठाच्या पोर्टलवर विद्यार्थ्यांकडून आॅनलाईन भरून घ्यावेत.
ज्या विद्यार्थ्यांनी गुणपडताळणी, फेरतपासणीसाठी अर्ज केले आहेत. त्यांनी त्यांचे अनुत्तीर्ण विषयांचे, परीक्षांचे अर्ज वेळेत भरावेत.
विद्यार्थ्यांनी परस्पर परीक्षा अर्ज घेऊन विद्यापीठाकडे पाठवू नयेत.
परीक्षा अर्ज भरण्यापूर्वी सर्व महाविद्यालयांनी आपापल्या विद्यार्थ्यांची पात्रता अंतिम झाल्याची खात्री करावी
अभ्यासक्रमांना संलग्नता विभाग, संबंधित शिखर संस्थेची मान्यता असलेली लेखी पत्र महाविद्यालयांनी सादर करावे.
कोणत्याही परिस्थितीत मुदतीनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
विद्यार्थ्यांनी निवडलेले विषय, परीक्षा केंद्र बरोबर नमूद केले आहे का? याची प्राचार्यांनी खात्री करावी. ७५ टक्के हजेरी भरलेल्याच विद्यार्थ्यांचे अर्ज पाठवावेत.