तुळशी जलाशय परिसरात साकारतेय प्रेक्षणीय स्थळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:21 IST2021-01-04T04:21:00+5:302021-01-04T04:21:00+5:30
धामोड : राधानगरी तालुक्याच्या पश्चिमेस असणाऱ्या निसर्गरम्य परिसरातील व कोल्हापूर-राधानगरी रस्त्यावरील आमजाई व्हरवडेपासून १० किलोमीटर अंतरावर साकारलेला तुळशी जलाशय ...

तुळशी जलाशय परिसरात साकारतेय प्रेक्षणीय स्थळ
धामोड : राधानगरी तालुक्याच्या पश्चिमेस असणाऱ्या निसर्गरम्य परिसरातील व कोल्हापूर-राधानगरी रस्त्यावरील आमजाई व्हरवडेपासून १० किलोमीटर अंतरावर साकारलेला तुळशी जलाशय धामोड परिसरातील एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून नावारूपास येत असून पर्यटकांना खुणावू लागले आहे. मुख्य रस्त्यालगतच असणारे विस्तीर्ण तुळशी धरण व त्याचबरोबर गावातील प्राचीन मंदिरे, मनमोहक डोंगर, केळोशी खुर्द येथील वनराई, ऐतिहासिक किल्ला, येथील सांस्कृतिक परंपरा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू पाहत आहे.
या स्थळांना पर्यटनदृष्ट्या विकास होण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याची गरज आहे. तसे झाल्यास हे गाव पर्यटनाच्या नकाशावर येऊ शकेल.
राधानगरी तालुक्याच्या पश्चिमेकडील निसर्गसंपन्न व भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेऊन १९६५ साली तुळशी धरणाचा पाया घालण्यात आला व १३ वर्षांनंतर १९७८ साली तुळशी धरण पूर्णत्वाला गेले. पाण्याची मुबलक उपलब्धता झाल्याने परिसरातील जमिनीवर उसाचे मळे डोलू लागले. परिणामी आर्थिक स्थिती सुधारल्याने धामोड परिसरातील दरडोई उत्पन्नाचा आलेख वाढू लागला आहे. दुसरीकडे, गेल्या १० वर्षांत येथील तुळशी जलाशयाची ओळखही विद्यार्थ्यांसाठी एक सुंदर पिकनिक पॉइंट म्हणून वाढत आहे. त्यामुळे धरण पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.
तुळशी धरणावरून दिसणारे सूर्यास्ताचे अनोखे दर्शन, समोरचा ऐतिहासिक किल्ला, तुळशी धरणाच्या पश्चिम बाजूस असणारा लोंढा नाला प्रकल्प, या धरणकाठावरील ज्योतिर्लिंगाचे जागृत देवस्थान, तलावाच्या पायथ्याशी असलेले हनुमान मंदिर अशी अनेक ठिकाणे येथे पाहण्यासारखी आहेत. पावसाळ्याच्या दिवसांत इथे पडणाऱ्या धो-धो पावसामुळे डोंगररांगांतून अनेक नद्या व धबधबे कोसळतात. हे दृश्य डोळ्यांत साठवण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसांतही पर्यटकांची संख्या उल्लेखनीय अशी असते .
डोंगरमाथ्यावरून तुळशी नदीचा झालेला उगम, येथील निसर्गरम्य परिसर, थंड हवा, डोंगर, दऱ्यांमधून भ्रमंती, वनराईने नटलेला परिसर पर्यटकांना नेहमीच खुणावत असल्याने पर्यटकांची ओढा वाढू लागली आहे. शनिवार व रविवारी या सुट्टीच्या दिवशी तुळशी धरणाचा परिसर पर्यटकांनी गजबलेला असतो. शाळेच्या सहलींची नेहमीच लगबग सुरू असते. मात्र पर्यटनदृष्ट्या हा परिसर अद्यापही दुर्लक्षितच आहे.
फोटो ओळी
धामोड (ता. राधानगरी) येथील तुळशी धरणाचा संग्रहित फोटो व धरणावर साकारत असलेली फुलबाग.