संस्कृती उत्सवातील देखावे, प्रदर्शने आज खुली होणार
By Admin | Updated: January 16, 2015 23:42 IST2015-01-16T23:13:42+5:302015-01-16T23:42:20+5:30
कोल्हापुरातून उद्या शोभायात्रा : भारत विकास संगम संमेलनांतर्गत उत्सव

संस्कृती उत्सवातील देखावे, प्रदर्शने आज खुली होणार
कोल्हापूर : चौथ्या भारत विकास संगम संमेलनातंर्गत कणेरी (ता. करवीर, कोल्हापूर) येथील सिद्धगिरी मठाच्या परिसरात रविवार(दि. १८)पासून आठवडाभर भारतीय संस्कृती उत्सव रंगणार आहे. त्याच्या तयारीसाठी सुमारे पाच हजार कारागीर, भाविक आणि स्वयंसेवक अहोरात्र झटत आहेत. उत्सवातील विविध प्रदर्शने, देखावे आणि कलाकृती, कलादालनाचे काम उद्या, शनिवारी सायंकाळपर्यंत पूर्ण होऊन ती पाहण्यासाठी खुली करण्यासाठी संयोजकांची आज, शुक्रवारी युद्धपातळीवर तयारी सुरू होती.
शेतकऱ्यांनी आपली पिकांची स्वत:च विक्री करावी तसेच विविध कारागीरांच्या कलाकृती समाजापर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने उत्सवस्थळी सहाशे स्टॉल्स्ची, प्रमुख कार्यक्रमस्थळी असलेला आठ लाख स्क्वेअर फुटांच्या मंडप उभारणी पूर्ण झाली आहे.
भोजन मंडप, आयुर्वेदिक, शैक्षणिक आदी स्वरूपातील प्रदर्शनाचे मंडप उभारणीची तयारी वेगाने सुरू होती. एकेरी मार्ग, पार्किंगची व्यवस्था करण्याची लगबग दिवसभर सुरू होती. उत्सवानिमित्त रविवारी (दि. १८) सकाळी नऊ वाजता शहरातील गांधी मैदानापासून शोभायात्रा काढण्यात येईल. दरम्यान, आज पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा, पोलीस उपजिल्हा अधीक्षक अमर जाधव, भारत विकास संगमचे प्रमुख संयोजक बसनगोंडा पाटील यांनी उत्सवस्थळी भेट देऊन पाहणी केली. (प्रतिनिधी)