घोटाळ्यांमुळे सत्तेत असल्याची लाज वाटते

By Admin | Updated: July 19, 2015 23:53 IST2015-07-19T23:51:42+5:302015-07-19T23:53:06+5:30

क्षीरसागर यांचा ‘भाजप’वर निशाणा : शिवसेनेत स्वबळाची धमक : अरुण दुधवडकर

The scams cause shame for being in power | घोटाळ्यांमुळे सत्तेत असल्याची लाज वाटते

घोटाळ्यांमुळे सत्तेत असल्याची लाज वाटते

कोल्हापूर : चिक्की घोटाळा, बोगस डिग्रीसह मित्रपक्षाच्या अन्य भानगडींनी कोणाबरोबर सत्तेत बसलो आहोत, याची लाज वाटते. शिवसेना सोडली तर एकही पक्ष स्वच्छ म्हणता येणार नाही, अशा शब्दांत आमदार राजेश क्षीरसागर यांनी ‘भाजप’वर निशाणा साधला. श्राद्ध, जावळाच्या कार्यक्रमात जाऊन पैशासह महापालिकेची उमेदवारी जाहीर करण्याचा सपाटा काही मंडळींनी लावला आहे; पण आमचे कार्यकर्ते कडवे शिवसैनिक आहेत. ते कधीही फुटणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
टाऊन हॉल येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात रविवारी आयोजित केलेल्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर होते.
आमदार क्षीरसागर म्हणाले, आजची राजकीय परिस्थिती वाईट आहे. मित्रपक्षाच्या मंत्र्यांच्या घोटाळ्याने सरकारची बदनामी होत आहे. शिवसेना सोडली तर सर्वच पक्ष बदनाम झाले असून, जनता मोठ्या विश्वासाने आमच्याकडे बघत आहे. गेले आठ-दहा महिने महापालिका निवडणुकीची तयारी करीत आहोत. जनतेमध्ये जाऊन, तिचा विश्वास संपादन करून, एकजुटीने कामाला लागून कोणत्याही परिस्थितीत महापालिकेवर भगवा फडकवायचा निर्धार केल्याचे आमदार क्षीरसागर यांनी सांगितले.
अरुण दुधवडकर म्हणाले, येथे पक्षाशिवाय नातेगोते पाहूनच मतदान होते. त्यानुसार निवडणुकीची तयारी करा. अजूनही वेळ गेलेली नाही. महापालिकेत भगवा फडकविण्यासाठी ७७ प्रभागांत तयारी ठेवा. मित्रपक्ष साद घालू लागला तर ठीक; अन्यथा बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला स्वबळाची धमक दिली आहे. विधानसभा निवडणुकीतील अनुभव पाठीशी असल्याने युतीबाबत गाफील राहू नका, असा सल्लाही दुधवडकर यांनी दिला.
माजी उपमहापौर उदय पोवार, शहरप्रमुख शिवाजी जाधव, नंदकुमार वळंजू, प्रा. विजय कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. दुर्गेश लिंग्रस, स्मिता माळी, पूजा भोरे, किशोर घाटगे, आदी उपस्थित होते.


‘महाडिक पॅटर्न’साठी
लाल दिवा द्या
येथे ‘महाडिक पॅटर्न’ चालतो. यासाठी पक्षाने काही गोष्टी करणे गरजेचे आहे. राजेश क्षीरसागर यांना मंत्रिपद द्या, अशी मागणी विजय कुलकर्णी यांनी केली. हाच धागा पकडत, तीनचे सहा आमदार कोल्हापूरने दिल्याने त्याची दखल पक्षप्रमुखांनी घेतली आहे. त्यामुळे लाल दिवा तुम्हालाच मिळाला पाहिजे, असे सूचक वक्तव्य दुधवडकर यांनी केले.


भाजपच्या अधिवेशनाला ‘भगव्या सप्ताहा’चे उत्तर
मित्रपक्षाला काय बोलणार? माझ्यावर मर्यादा असल्याचे सांगत, अधिवेशनाच्या निमित्ताने अखंड मंत्रिमंडळ आले, दिल्लीवरून अमित शहाही आले; पण त्याला राजेश क्षीरसागर यांनी ‘भगव्या सप्ताहा’च्या माध्यमातून चोख उत्तर दिल्याचे अरुण दुधवडकर यांनी सांगितले.


जिल्ह्यात साडेचार पालकमंत्री
मित्रपक्षाचे कार्य कमी आणि कारवायाच अधिक आहेत. जिल्ह्यात साडेचार पालकमंत्री कार्यरत आहेत. ते कोणाची माती, श्राद्ध, जावळ सोडत नाहीत. अशा प्रवृत्तीला लगाम घालून जिल्ह्याला राजेश क्षीरसागर यांच्या रूपाने कर्तबगार पालकमंत्री द्या, अशी मागणी विजय कुलकर्णी यांनी केली.

Web Title: The scams cause shame for being in power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.