सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील ‘केसपेपर’मध्ये घोटाळा
By Admin | Updated: August 25, 2014 22:54 IST2014-08-25T22:42:56+5:302014-08-25T22:54:06+5:30
प्रशासनाकडून अभय : ‘सिव्हिल’च्या कर्मचाऱ्याचा प्रताप

सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील ‘केसपेपर’मध्ये घोटाळा
सचिन लाड - सांगली --गोरगरिबांचा आधार म्हणून पश्चिम महाराष्ट्रात लौकिक असलेल्या सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील (सिव्हिल) केसपेपर विभागात लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. घोटाळा करणारा कर्मचारी या विभागातच काम करीत होता. घोटाळ्याचा हा प्रकार चव्हाट्यावर येऊनही ‘सिव्हिल’ प्रशासनाने केवळ घोटाळेबाज कर्मचाऱ्याची दुसऱ्या विभागात बदली करून यावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. बाहेर कुणालाही हे समजू नये, याची प्रशासनाने कमालीची खबरदारी घेतली आहे.
रुग्णालयाचा डोलारा मोठा आहे. कोल्हापूर, सोलापूर व कर्नाटकातील रुग्ण येथे औषधोपचारासाठी दाखल होतात. यामुळे केसपेपर विभागात नऊ ते दहा कर्मचारी नियुक्त केले आहेत. हे कर्मचारी रात्रं-दिवस अशा दोन ‘शिफ्ट’मध्ये काम करतात. नव्याने येणाऱ्या रुग्णांचा केसपेपर काढणे, रुग्णाला डिसचार्ज मिळाला असेल, तर त्याचे बिल भरून घेणे, जिल्हा शल्यचिकित्सकांनी मंजूर केलेल्या वैद्यकीय बिलाची रक्कम भरून घेणे, एक्स-रे काढण्याचे पैसेही भरून घेतले जातात. यासाठी रुग्णालयाचे बिल बुक आहे. या बुकमध्ये कार्बन घालून बिल काढले जाते. बिलाची एक पावती रुग्णास दिली जाते, तर दुसरी रुग्णालय प्रशासनाकडे राहते. हा घोटाळेबाज कर्मचारी गेली अनेक वर्षे या केसपेपर विभागात तळ ठोकून होता. या काळात त्याने रुग्णांकडून जमा झालेल्या बिलाच्या पावत्या फाडल्या; मात्र या पावतीखाली त्याने कार्बनच घातला नाही. बिलाच्या स्वरुपात मिळालेली ही रक्कम त्याने खिशात घालण्याचा उद्योग केला.
कर्मचाऱ्यांना ड्युटी संपल्यानंतर बिलाची रक्कम प्रशासनाकडे जमा करावी लागते. बिल बुकात झालेल्या पावत्यांमधील नोंदीनुसार प्रशासन त्यांच्याकडून हिशेब घेते. या कर्मचाऱ्याने कार्बनच घातला नसल्याने हिशेबाचा ताळमेळ प्रशासनाला लागला नाही. यामुळे त्याची पैसे खाण्याची चटक वाढत गेली. केसपेपर विभागाची दरवर्षी तपासणी असते. त्यावेळी हा घोटाळा उघडकीस आला. साधारणपणे चार ते पाच लाखांचा या कर्मचाऱ्याने घोटाळा केला असल्याची चर्चा सुरू आहे. या कर्मचाऱ्यास अधिष्ठातांच्या कार्यालयात बोलावून घेण्यात आले. त्याच्याकडून सर्व माहिती घेतली. प्रशासकीय पातळीवर त्याची चौकशी सुरू आहे.
हा विषय अंतर्गत होता. त्याची रुग्णालय प्रशासनाने गंभीर दखल घेऊन चौकशीसुद्धा केली आहे. संबंधित कर्मचाऱ्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. ए. कुरेकर व डॉ. राजेंद्र भागवत यांनी कारवाई केली आहे.
- डॉ. एन. जी. हेरेकर,
अधिष्ठाता, शासकीय रुग्णालय, सांगली
नेमकी आर्थिक जबाबदारी कोणाची?
यापूर्वीही केसपेपर विभागात घोटाळा झाला होता. त्यावेळी सात कर्मचाऱ्यांची मिरज शासकीय रुग्णालयात बदली करण्यात आली होती. आताही घोटाळा झाला आहे. केवळ बदल्या करुन कारवाई केल्याचे कागदोपत्री दाखविले जात असले तरी, घोटाळ्याची ही रक्कम कोण भरणार? त्याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाच्या पैशावरच डल्ला मारला जात असताना, वरिष्ठ अधिकारी केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. तसेच याविषयी ते भाष्य करण्यासही तयार नाहीत.