मलकापुुरात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा
By Admin | Updated: April 18, 2015 00:02 IST2015-04-17T22:58:54+5:302015-04-18T00:02:29+5:30
नगरपंचायत : बरखास्त करून प्रशासक नेमावा; अशोकराव थोरात यांची मागणी

मलकापुुरात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा
मलकापूर : ‘मलकापूर नगरपंचायत स्थापनेपासून केलेल्या प्रत्येक वर्षाच्या लेखापरीक्षण अहवालात अनेक आक्षेप घेतले आहेत. त्या-त्या काळातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी कोणत्याच आक्षेपाची दुरुस्ती रिपोर्ट आजतागायत दिलेला नाही. त्यामुळे नगरपंचायत कारभारात कोट्यवधींचा घोटाळा झाला आहे. या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी नगरपंचायत बरखास्त करून प्रशासक नेमावा,’ अशी मागणी अशोकराव थोरात यांनी अन्यायनिवारण समितीच्या वतीने केली.
येथील मळाई टॉवर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सुधाकर शिंदे, अंंकुश जगदाळे, हनिफ मुल्ला, संजय जिरंगे, दादासाहेब येडगे, अमोल थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
थोरात म्हणाले, ‘नगरपंचायतीचे लेखापरीक्षण झाल्यानंतर शासकीय लेखा परीक्षकांना त्या-त्या वर्षाचा दुरुस्ती अहवाल देणे बंधनकारक असते. मात्र, गेल्या सहा वर्षांत एकही दुरुस्ती अहवाल त्यांनी सादर केलेला नाही.
याशिवाय ग्रामपंचायत काळातीलही दुरुस्ती रिपोर्ट दिलेला नाही. त्यामुळे त्या-त्या काळातील अधिकारी व पदाधिकारी याला जबाबदार आहेत. अनेक वर्षांपासून दुरुस्ती अहवाल देता येत नसेल तर ते सर्व आक्षेपातील भ्रष्टाचारास पात्र आहेत. या नगरपंचायतीच्या ढिसाळ कारभाराची सखोल चौकशी करावी व ती योग्य पद्धतीने होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपंचायतीवर प्रशासक नेमावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. प्रथम अधिकारी म्हणून पहिल्यांदा जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणार आहे. अधिकाऱ्यांनी दिशा आम्ही ठरवू.’
सन २००१-२००२ ते २००७-२००८ या कालावधीतही ग्रामपंचायतीच्या कारभारात कोट्यवधींचा घोटाळा झाला आहे. त्या काळातीलही दुरुस्त अहवाल सादर केलेला आहे. याशिवाय लेखापरीक्षण अहवालानुसार १५ कर्मचाऱ्यांनी अफरातफर केल्याचा आरोप आहे. प्रत्यक्षात मात्र, चारच कर्मचाऱ्यांवर कारवाई होते. त्यातीलही तीन कर्मचारी सध्या पैसे भरून घेऊन कामावर आहेत.
तर बाकीच्यांचे काय? असा सवाल करून अशा अनेक घटना नगरपंचायत कारभारात भ्रष्टाचारास पात्र असल्याचे सिद्ध होत आहे. (प्रतिनिधी)
दोषींवर वसुलीची कारवाई करा...
नगरपंचायत बरखास्त करून प्रशासक नेमावा
किमान सहा वर्षांच्या कारभाराची सखोल चौकशी करावी
लोखापरीक्षण अहवालानुसार दोषींवर रक्कम वसुलीची कारवाई करावी
दोषींवर गुन्हेगारी कट करणे, अपहार करणे, बनावट कागदपत्रे तयार करणे, अशा कृत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत
नगरपंचायतीवर जिल्हाधिकाऱ्यांनी नगरविकास खात्याअंतर्गत कारवाई करावी
ग्रामपंचायत कालावधीतील चौकशी करून फौजदारी दाखल करावी
मलकापुरात दबावतंत्राचाच वापर
मलकापूर नगरपंचायत व ग्रामपंचायत कालावधीत मुख्यमंत्री व मंत्र्यांच्या जवळचे असणाऱ्यांची १५ वर्षे सत्ता आहे. ग्रामपंचायत काळात तर डॉ. अतुल भोसले व जयंत पाटील यांच्याशीही हात मिळवणी करून मनोहर शिंदे यांनी सत्ता उपभोगली. केंद्रात व राज्यात सत्ताधारी मुख्यमंत्री व मंत्री जवळचे असल्यामुळे आजपर्यंत मलकापुरात दबाव तंत्राचाच अवलंब केला, त्यामुळेच त्यांचे फावले आहे, असा आरोपही अशोकराव थोरात यांनी केला.