नाही नाही..म्हणत आबासाहेब त्याच गावाला गेले..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:25 IST2021-04-28T04:25:21+5:302021-04-28T04:25:21+5:30
राम मगदूम गडहिंग्लज : ज्या गावची वाट आम्हाला ठावूकच नाही, त्या वाटेवरचा प्रवासी मला कसे ठरविता ? मी जेथे ...

नाही नाही..म्हणत आबासाहेब त्याच गावाला गेले..!
राम मगदूम
गडहिंग्लज : ज्या गावची वाट आम्हाला ठावूकच नाही, त्या वाटेवरचा प्रवासी मला कसे ठरविता ? मी जेथे आहे तिथेच स्थिर आहे, भले उमेदवारी मिळो न मिळो, ‘सोडदोस्त’ म्हणून माझी गणना व्हावयास मला नको आहे. विचारावर श्रद्धा ठेवणारा मी कार्यकर्ता आहे, असे म्हणणारे बाळासाहेब कुपेकर तथा आबासाहेब नाही..नाही..म्हणत त्याच गावाला का गेले? म्हणजेच त्यांनी सत्तारूढ आघाडीला पाठिंबा का दिला ? याचीच चर्चा गडहिंग्लज विभागात सुरू आहे.
राष्ट्रवादीचे दिवंगत नेते बाबासाहेब कुपकेर यांचे बंधू बाळासाहेब (आबासाहेब) व पुतणे संग्रामसिंह (दादा) हे दोघेही गेल्या ५-६ वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय आहेत. परंतु, त्या आधीपासूनच ते मंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील 'गोकुळ बचाव कृती समिती'त सक्रिय होते. आबासाहेबांनी 'गोकुळ'च्या गेल्या दोन निवडणुका विरोधी आघाडीकडूनच लढवल्या होत्या. या पार्श्वभूमीमुळे बाळासाहेबांनी यावेळी 'गजबजलेल्या विरोधी आघाडीत' उमेदवारीवर हक्क सांगणे काही गैर नव्हते, त्यांनी तो सांगितलाही. परंतु, जिल्ह्यांतील बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरम्यान, कृती समितीमधील सहकारी विजय मोरे व किशोर पाटील यांच्यासमवेत त्यांनी आमदार पी. एन. पाटील यांची भेट घेतली तरीदेखील उमेदवारीसाठी आपण त्यांना कधीच भेटलेलो नाही, असा लेखी खुलासा त्यांनी 'लोकमत'च्या बातमीसंदर्भात केला.
परंतु, त्या पत्राची शाई वाळण्यापूर्वीच त्यांनी कानडेवाडीत मेळावा घेऊन पुतण्यासह सत्ताधारी आघाडीला पाठिंबा दिला. त्या मेळाव्यात आपल्यावर अन्याय झाल्याचा सूरही काका-पुतण्यांनी आळवला. त्यामुळे त्यांच्या 'पाठिंब्या'ची कारणमीमांसा जाणकार मंडळींकडून सुरू आहे.
--------------------------------------
* घडले-बिघडले !
- स्व. कुपेकर यांच्या पश्चात झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीसह सार्वत्रिक निवडणुकीतही राष्ट्रवादीची उमेदवारी कुपेकरांच्या पत्नी संध्यादेवींनाच मिळाली.
- २०१४ मध्ये संग्रामसिंहनी जनसुराज्यतर्फे संध्यादेवींच्या विरोधात निवडणूक लढवली. त्यावेळी संग्रामसिंह यांचे सख्खे बंधू रामराज हे संध्यादेवींच्या पाठीशी तर बाळासाहेब हे संग्रामसिंहांच्या पाठीशी राहिले. 'गोकुळ'च्या गेल्या निवडणुकीत संध्यादेवी सत्ताधारीबरोबर होत्या तर बाळासाहेब विरोधी आघाडीकडून पराभूत झाले. त्यानंतर संध्यादेवींच्या शिफारशीमुळे 'रामराज'ना 'गोकुळ'मध्ये स्वीकृत संचालक म्हणून संधी मिळाली.
- संध्यादेवी यावेळी विरोधी आघाडीच्या बाजूने असून त्यांच्याच आग्रहामुळे 'गडहिंग्लज'मधील उमेदवारीची समीकरणेही फिरली. त्यामुळे संध्यादेवींचा सहभाग असणाऱ्या आघाडीत राहणे बाळासाहेबांना तर २०१८ मध्ये 'गोकुळ'च्या मल्टिस्टेट विरोधातील लढाईत आमदार म्हणून संध्यादेवींची भूमिका काय ? असा सवाल विचारणाºया संग्रामसिंहाचीही कोंडी झाल्यामुळेच काका-पुतण्याला 'त्या' गावाची वाट धरावी लागली.
--------------------------------------
* बाळासाहेब कुपेकर : २७०४२०२१-गड-०३
* संध्यादेवी कुपेकर : २७०४२०२१-गड-०४
* संग्रामसिंह कुपेकर : २७०४२०२१-गड-०५