शिवारेत बाटली अखेर आडवी
By Admin | Updated: March 28, 2017 00:31 IST2017-03-28T00:31:33+5:302017-03-28T00:31:33+5:30
वारणा खोऱ्यातील पहिले गाव : चारशे सव्वीस महिलांचे मतदान

शिवारेत बाटली अखेर आडवी
वारणा कापशी/ मलकापूर : शिवारे (ता. शाहूवाडी) येथे दारूबंदी विरोधात पार पडलेल्या निवडणुकीत तब्बल चारशे सव्वीस महिलांनी मतदान करून उस्फूर्तपणे ठराव जिंकला. ठरावाच्या विरोधात केवळ दहा मते पडली. दारूबंदी करणारे शिवारे हे जिल्ह्यातील ४१ वे, तर वारणा खोऱ्यातील पहिले गाव ठरले आहे.
जनसेवा युवा प्रतिष्ठान, ग्रामपंचायत, महिला वर्ग आणि युवा मंडळांच्या पुढाकारातून शिवारे येथे दारूबंदीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. सकाळी आठ वाजता मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला. दुपारी चार वाजता मतदान संपले. यामध्ये एकूण ६०० मतांपैकी दारूबंदी विरोधात तब्बल ४२६ महिलांनी मतदान करून बाटली अखेर आडवी केली. दहा महिलांनी ठरावाच्या विरुद्ध मतदान केले, तर तब्बल एकतीस महिलांचे मतदान अवैध ठरले. शिवारे येथील दारूची बाटली आडवी होणार की उभी राहणार याकडे पंचक्रोशीतील गावांचे लक्ष होते. निवडणूक निर्णय अधिकारी नायब तहसीलदार राजेंद्र पाटील यांनी काम पाहिले, तर केंद्रप्रमुख म्हणून अंकुश रानमळे होते. मतदान प्रक्रियेसाठी एम. एम. जाधव, रोहिणी पाटील, ए. बी. पाटील, नसीम मुल्लाणी यांनी काम पाहिले. (वार्ताहर)