सावंत यांच्या कोठडीत वाढ
By Admin | Updated: May 6, 2014 19:31 IST2014-05-06T19:31:44+5:302014-05-06T19:31:44+5:30
कुंभवडेतील युवकावर हल्ला प्रकरण

सावंत यांच्या कोठडीत वाढ
कणकवली : तालुक्यातील कुंभवडे येथील युवकावर हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या कॉँग्रेस तालुकाध्यक्ष गोट्या सावंत यांच्या कोठडीत येत्या ७ मेपर्यंत वाढ झाली आहे. भादंवि ३०७ खाली गोट्या सावंत यांच्यासह सातजणांना अटक झाली होती. गोट्या सावंत यांना पाच दिवस कोठडी ठोठावण्यात आली होती. निवडणुकीतील राग मनात ठेवून कुंभवडेतील निनाद सावंत याला कनेडी येथे मारहाण करण्यात आली होती. तसेच कुंभवडेतील त्याच्या घरावरही दगडफेक करण्यात आली होती. मारहाणीत निनाद सावंत आणि त्याच्या आईसह दोघे जखमी झाले होते. मारहाणप्रकरणी पांडुरंग सावंत यांनी तक्रार दिली होती. याप्रकरणात गोट्या सावंत यांच्यावर भादंवि ३०७ कलम लावण्यात आले होते. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने रविवारी सायंकाळी पोलिसांनी गोट्या सावंत यांना न्यायालयात हजर केले. गुन्ह्यात वापरण्यात आलेली गाडी जप्त करण्यासाठी पोलिसांनी अजून सात दिवसांच्या कोठडीची मागणी न्यायालयाकडे केली. न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी मंजूर केली. सरकार पक्षातर्फे अॅड.कुलकर्णी यांनी काम पाहिले. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत लांगी तपास करत आहेत. या निकालानंतर शहरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)