सव्वाचार लाखांचे दागिने लंपास
By Admin | Updated: March 9, 2015 01:10 IST2015-03-09T01:08:47+5:302015-03-09T01:10:00+5:30
‘केएमटी’मध्ये प्रवाशाला लुटले : शाहू मैदान ते शिवाजी चौक या दरम्यानची घटना

सव्वाचार लाखांचे दागिने लंपास
पेठवडगाव : के.एम.टी. बसमध्ये प्रवास करताना एका महिलेचे साडेएकवीस तोळे सोन्याचे दागिने असा सुमारे चार लाख ३१ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. ७) घडली; मात्र याची नोंद वडगांव पोलिसांत रविवारी झाली. हा गुन्हा जुना राजवाडा पोलीस ठाण्याकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला.
याबाबत फिर्याद धनश्री अमित घोरपडे (वय ३०, रा. पोस्टल कॉलनी, पाचगाव) यांनी दिली. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी घोरपडे या माहेरी के.एम.टी. बसने सासू-सासऱ्यासह पेठ वडगावला येत होते. यावेळी त्यांच्याकडे चार ते पाच पिशव्या होत्या. शाहू मैदान बसस्थानकवर वडगाव बसला गर्दी होती. दरम्यान, घोरपडे यांना बसमध्ये ढकलाढकली झाली. यावेळी अज्ञाताने पर्समध्ये हात घातल्याचे त्यांना जाणवले.
कोल्हापूरच्या शिवाजी चौकात आल्यावर त्यांना बसण्यास जागा मिळाली. यावेळी त्यांच्या पर्समध्ये दागिने नव्हते. त्यामुळे त्यांनी पतीला फोन करून घरी दागिने आहेत का? याची खात्री केली त्यामुळे दागिने चोरीस गेल्याची खात्री झाली. घोरपडे यांच्या आजीचे कसबा बावडा येथे निधन झाले होते. त्यामुळे ते सर्वजण तेथे गेले होते. पुन्हा स्वत: रात्री घरात जाऊन त्यांनी दागिन्यांचा शोध घेतला. त्यामुळे रविवारी फिर्याद दिली.
घोरपडे यांनी शाहू मैदान कोल्हापूर येथून ते वडगावला सिटी बसने प्रवास करताना शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने पर्समधील दागिने चोरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या दागिन्यामध्ये तीन तोळे सोन्याच्या पाटल्या ६० हजार, चार तोळे, चार बांगड्या ८० हजार, तीन तोळे दोन तोडे, ६० हजार, चार तोळे वजनाचे मंगळसूत्र ८० हजार, चार तोळे वजनाचा राणी हार ८० हजार, तीन तोळ्यांचा नेकलेस ६० हजार, अर्धा तोळा कानातील दोन टॉप्स वेल १० हजार असा सोन्याचा व चांदीचा छल्ला असा चार लाख ३१ हजार रुपयांचा समावेश आहे.
वडगांव पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली आहे. हा गुन्हा जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)