ऐतिहासिक बॅडमिंटन कोर्ट वाचवू
By Admin | Updated: March 19, 2016 00:23 IST2016-03-19T00:20:47+5:302016-03-19T00:23:23+5:30
अश्विनी रामाणे : कपिलतीर्थ मार्केटमधील बॅडमिंटन कोर्ट बचाव समितीचे निवेदन

ऐतिहासिक बॅडमिंटन कोर्ट वाचवू
कोल्हापूर : कपिलतीर्थ मार्केट येथील ऐतिहासिक बॅडमिंटन कोर्ट वाचवू, असे आश्वासन महापौर अश्विनी रामाणे यांनी शुक्रवारी दिले. महानगरपालिकेने बॅडमिंटन कोर्टाबाबतचा प्रस्ताव फेटाळावा, अशी मागणी ऐतिहासिक बॅडमिंटन कोर्ट बचाव समिती व विविध राजकीय, सामाजिक तथा क्रीडापे्रमी यांच्या शिष्टमंडळाने केली. शिष्टमंडळाने महापौर रामाणे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
कपिलतीर्थ मार्केट येथील ऐतिहासिक बॅडमिंटन कोर्टवर घाला घालण्याचा प्रयत्न काही अप्प्रवृत्ती करीत आहेत. या बॅडमिंटन कोर्टची स्थापना २९ जून १९६६ ची आहे. कोल्हापुरातील हे पहिले वुडन कोर्ट असून १९७३ ला या कोर्टवर अखिल भारतीय चॅम्पियनशिप स्पर्धा झाली होती. या कोर्टवर प्रसिद्ध राष्ट्रीय बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण, संजय शर्मा, किरण कौशिक यांसारखे दिग्गज खेळाडू खेळले आहेत. सध्या येथे जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन होत असते.
आज या कोर्टवर रोज सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत स्थानिक दोनशे विद्यार्थी एकूण ११ बॅचमध्ये सराव करीत असतात. अशा उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांच्या खेळात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करणे म्हणजे राजर्षी शाहूंच्या विचारांचा अनादर करणे होईल. शहराच्या मध्यवस्तीत अशा कोर्टची नागरिकांना नितांत गरज आहे. त्यामुळे नगरसेवक तसेच प्रशासनातील अधिकारी यांनी हा प्रस्ताव फेटाळून ऐतिहासिक बॅडमिंटन कोर्टचा बचाव करावा, असे निवेदनात म्हटले आहे.
शिष्टमंडळात महेश उरसाल, संभाजी साळुंखे, सुनील पाटील, प्रकाश सरनाईक, प्रसाद जाधव, प्रमोद सावंत, आकाश नवरुखे, केदार नाडगोंडे, सुधीर सूर्यवंशी, गौतम तपकिरे, राहुल महाजन, मोहन नार्वेकर, सुनील खोतलांडे, मंदार पाटील, केदार हसबनीस, निवास राऊत, निनाद कामत, सुनील राजवाडे, विनिता आंबेकर, राहुल पाटील, आदींचा सहभाग होता. ( प्रतिनिधी)