सावर्डे तर्फ असंडोली येथील उपसरपंच संभाजी कापडे यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:30 IST2021-07-07T04:30:44+5:302021-07-07T04:30:44+5:30
२०१७ ला ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक झाली होती. यामध्ये पारंपरिक विरोधक असलेले काँग्रेस व शिवसेना-जनसुराज्य युती यांच्यात नऊ जागांसाठी लढत ...

सावर्डे तर्फ असंडोली येथील उपसरपंच संभाजी कापडे यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर
२०१७ ला ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक झाली होती. यामध्ये पारंपरिक विरोधक असलेले काँग्रेस व शिवसेना-जनसुराज्य युती यांच्यात नऊ जागांसाठी लढत झाली होती.
काँग्रेसने माजी पंचायतसमिती सदस्य विलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीन जागा मिळविल्या तर शिवसेना व जनसुराज्यने कुंभी कासारी सह. साखर कारखान्याचे संचालक आबा रामा पाटील व संभाजी कापडे यांच्या नेतृत्वाखाली सह. सदस्य व लोकनियुुक्त सरपंच निवडून आणून बहुमत मिळविले. घराणेशाहीचा वारसा नसलेले पण आपल्या उत्तम सामाजिक कार्यातून पारंपरिक घराणेशाहीला शह देत राजकारणात यशस्वी झालेले संभाजी कापडे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली होती. त्यांनी साडेतीन वर्षांच्या कालावधीत सरपंचांसह सर्व सदस्यांना विचारात न घेता कारभार केला. परिणामी विरोधकांसह स्वतःच्या आघाडीतील सदस्यांमध्ये त्यांचे बिनसले. निर्माण झालेल्या नाराजीतून सर्वजण एकवटले व पदाचा गैरवापर करणे, सर्व नियमांचे उल्लंघन करणे, सदस्य व कर्मचारी यांच्याशी उद्धट वर्तणूक करणे, सरपंच व सदस्य यांना विश्वासात न घेता परस्पर गैरकारभार करणे या कारणांसाठी तहसीलदारांकडे तक्रार दाखल झाली. लोकनियुक्त सरपंच भाग्यश्री बच्चे, महेश भोसले, मोहन जाधव, दीपाली पाटील, रूपाली परीतकर, छाया सुतार, जयश्री पाटील अशा सात जणांनी तहसीलदारांकडे उपसरपंच कापडे यांच्याविरोधात अविश्वासदर्शक ठराव दाखल केला. यासंदर्भात चर्चा करून निर्णय घेण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात सदस्यांची विशेष सभा बोलविण्यात आली व सदर सभेसाठी बिनचूक हजर राहण्याच्या सूचना तहसीलदारांनी दिल्या होत्या.