सतेज, पी. एन. मनोमिलनातून काँग्रेस बळकट करू

By Admin | Updated: June 15, 2016 00:08 IST2016-06-14T23:21:29+5:302016-06-15T00:08:36+5:30

पतंगराव कदम : कोल्हापुरातून सुरुवात करूया; कौलव येथे बाळासाहेब पाटील पुण्यतिथी कार्यक्रम

Satze, p. N. Let's strengthen the Congress in the mind | सतेज, पी. एन. मनोमिलनातून काँग्रेस बळकट करू

सतेज, पी. एन. मनोमिलनातून काँग्रेस बळकट करू

भोगावती : काँग्रेस पक्षाने विधायक दृष्टिकोन ठेवून विकास साधला आहे. या पक्षाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्यामुळे काँग्रेस तशी संपणार नाही. म्हणून पक्ष संघटना बळकट करण्याची सुरुवात कोल्हापुरातून पी. एन. पाटील आणि आ. सतेज पाटील यांच्या मनोमिलनाने करू, असे माजी मंत्री पतंगराव कदम यांनी जाहीर केले.कौलव (ता. राधानगरी) येथे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष स्वर्गीय बाळासाहेब पाटील-कौलवकर यांच्या २५ व्या पुण्यतिथी कार्यक्रमात ते बोलत होते.कदम म्हणाले, बाळासाहेब पाटील हे संयमी नेतृत्व होते. सहकाराचा आज दिसणारा वटवृक्ष हा एकेकाळी कौलवकरांनी लावलेले रोपटं होतं, म्हणूनच त्यांचे विचार राज्याने स्वीकारले आहेत. बाळासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे संघटन मजबूत करण्याची सुरुवात करून खणखणीत नाणं करू, असा विश्वास व्यक्त केला.
माजी आ. पी. एन. पाटील म्हणाले, बाळासाहेब पाटील-कौलवकरांचे कार्य राज्याला परिचित आहे. म्हणून आज तमाम जनसागराच्या साक्षीने त्यांची पुण्यतिथी साजरी झाली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची उभी पिके वाया गेली आहेत. त्यामुळे कर्जमाफी आधी शेतसारा माफी झाली पाहिजे, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला. सरकारने काँग्रेसमुक्त भारत करण्यापेक्षा आत्महत्यामुक्त भारत बनवावा, असा संकल्प करावा. सोनिया गांधी यांनी देशात ७१ हजार कोटींची कर्जमाफी केली होती. भोगावती कारखान्यावर शंभर कोटींचे कर्ज आहे म्हणणाऱ्यांनी आता २00 कोटींच्या वर कर्ज केले आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
देवयानी हलके, लक्ष्मीकांत हुंडे, रोहन पाटील, ए. डी. पाटील, महादेव पाटील व विविध स्पर्धांतील स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. जि. प.चे शिक्षण व अर्थ सभापती अभिजित तायशेटे, तालुका अध्यक्ष हिंदुराव चौगले, शामराव देसाई, राधानगरीचे सभापती जयसिंग खामकर, विश्वनाथ पाटील, ‘भोगावती’चे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले, माजी संचालक विजयसिंह डोंगळे, धीरज डोंगळे, डी. आय. पाटील, उपसभापती दत्तात्रय मुळीक, विजयसिंह मोरे, शिवाजी तळेकर, एम. आर. पाटील, रमेश वारके, प्रा. ए. डी. चौगले, संभाजीराव पाटील उपस्थित होते.
प्रास्ताविक उदयसिंह पाटील-कौलवकर यांनी केले. संजय चरापले यांनी आभार मानले.(वार्ताहर)

Web Title: Satze, p. N. Let's strengthen the Congress in the mind