शाहूवाडीत सत्य’जीत’च..
By Admin | Updated: October 20, 2014 00:43 IST2014-10-20T00:21:52+5:302014-10-20T00:43:08+5:30
कोतोली परिसरात गुलाल दोन्ही गटांचा..सरुडमध्ये अक्षरश: दिवाळी

शाहूवाडीत सत्य’जीत’च..
राजाराम कांबळे, रामचंद्र पाटील - मलकापूर -शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीने व शेवटपर्यंत श्वास रोखून राहिलेल्या अटीतटीच्या निवडणुकीत शिवसेनेचे सत्यजित पाटील यांनी जनसुराज्य शक्तीचे विनय कोरे यांच्यावर विजय मिळविला. -शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे सत्यजित पाटील, जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे, स्वाभिमानीचे अमरसिंह पाटील, राष्ट्रवादीचे बाबासाहेब
पाटील-आसुर्लेकर, मनसेचे संजय पाटील यांच्यासह ११ उमेदवार आपले नशीब आजमवत होते. या मतदारसंघात सत्यजित पाटील व विनय कोरे यांच्यातच खरी लढत होती. दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार यंत्रणा राबविली होती. सत्यजित पाटील यांनी गावा-गावांत आपल्या विकासाचे व्हिजन जनतेसमोर मांडले होते, तर विनय कोरे यांनी पाच वर्षांत केलेल्या विकासकामांच्या जोरावर मतदारसंघात प्रचाराचे रान उठविले होते.
सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी शाहूवाडी तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र खाडे यांच्या अध्यक्षतेखाली मतमोजणीस प्रारंभ झाला. शाहूवाडी तालुक्यातील गावांपासून मतमोजणीस सुरुवात झाली. पहिल्यापासून सेनेचे सत्यजित पाटील यांनी विनय कोरे यांच्यावर मतांची आघाडी घेतली होती. १३ व्या फेरीपर्यंत सत्यजित पाटील यांनी २३०३४ मतांची आघाडी घेतली होती. आघाडी पाहून सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली. २२ व्या फेरीपर्यंत सत्यजित पाटील आघाडीवर होते. शाहूवाडी तालुक्यातून २२८३८ एवढ्या मतांची आघाडी सत्यजित पाटील यांना मिळाली. १४ व्या फेरीपासून पन्हाळा तालुक्यातील मतदान मोजण्यास प्रारंभ झाला.
पन्हाळ्यातून विनय कोरे यांना प्रत्येक फेरीत ३५०० ते ४००० मतांची आघाडी मिळत होती. १९ व्या फेरीत विनय कोरे यांनी सत्यजित पाटील यांची मतांची आघाडी कमी करून ८४० एवढीच सत्यजित पाटील यांची आघाडी राखली.
मात्र, कोतोली, पोर्ले, आसुर्ले या गावांत सत्यजित पाटील यांना मतदान झाल्यामुळे त्यांची मतांची आघाडी वाढत होती. २३-२४ व्या फेरीअखेर सत्यजित पाटील यांनी ३८८ मतांची आघाडी घेऊन विजयाचा गुलाल उधळला.
मतमोजणी केंद्राबाहेर शिवसेना व जनसुराज्य पक्षाचे कार्यकर्ते थांबले होते. मतमोजणीचा निकाल जसा बाहेर सांगितला जात होता, तसे कार्यकर्ते फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत होते. शेवटपर्यंत कार्यकर्त्यांमध्ये निकालाची उत्कंठा वाढत होती. कधी नव्हे एवढी ही निवडणूक अटीतटीची झाली. मतमोजणीच्या शेवटपर्यंत दोन्ही उमेदवारांमध्ये काटा लढत पाहायला मिळाली.
कोतोली परिसरात गुलाल दोन्ही गटांचा
कोतोली : कोतोली (ता. पन्हाळा) परिसरात प्रथम विनय कोरे निवडून आल्याच्या आफवेने सावकर ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून, गाड्या फिरवून सावकर... सावकर घोषणा दिल्या. नंतर निकाल बदलला व सत्यजित पाटील निवडून आल्याने सावकर गटाच्या कार्यकर्त्यांनी काढता पाय घेऊन घर गाठले. पुन्हा सत्यजित पाटील गटाने गुलाल, फटाके उडवत, घोषणा देत जल्लोष केला.
विजयाचे शिल्पकार
सत्यजित पाटील यांच्या विजयात युवा नेते रणविरसिंह गायकवाड यांची भूमिका निर्णायक ठरल्याचे लोकांचे म्हणणे आहे. तसेच अमर पाटील यांनी पन्हाळ्यातून कोरेंना लीड घेण्यापासून रोखल्याने त्याचाही फायदा सत्यजित पाटील यांना झाला.
शाहूवाडीने तारले
शाहूवाडी तालुक्यात सत्यजित पाटील यांच्या गटाची मोठी ताकद आहे. जनतेची व तरुण वर्गातून सत्यजित पाटील यांना या निवडणुकीत पहिल्यापासून सहानुभूती मिळाली.
सरुडमध्ये अक्षरश: दिवाळी
सरुड : शिवसेनेचे उमेदवार सत्यजित पाटील-सरुडकर यांच्या विजयाने सरुड परिसरात अक्षरश: दिवाळीच साजरी करण्यात आली.
गेल्या वेळच्या विधानसभा निवडणुकीत थोडक्यात विजय हुकल्याने यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांची विजयाबद्दल उत्कंठा शिगेला पोहोचली होती. सकाळी सात वाजल्यापासूनच आमदार सत्यजित पाटील यांच्या सरुड येथील घरामध्ये शिवसैनिकांची गर्दी सुरू झाली होती. पहिल्या फेरीपासूनच सत्यजित पाटील यांनी आघाडी घेतली होती.
फेरीनिहाय निकाल जसजसा समजू लागला तस-तसा शिवसैनिकांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. शेवटच्या फेरीअखेर निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. निकालाचा फोन आला आणि एकच जल्लोष झाला. सरुडमध्ये आज अक्षरश: दिवाळी साजरी करण्यात आली होती. यामध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता. दोन वाजता सत्यजित पाटील यांच्यासह शिवसैनिक शाहूवाडीला रवाना झाले. विजयाच्या घोषणा, फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण यांनी परिसर दणाणून गेला.
शेवटपर्यंत श्वास रोखला
शिवसेना उमेदवार सत्यजित पाटील यांनी पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत आघाडी कायम ठेवली. पन्हाळा तालुक्यात ही आघाडी कमी-कमी होत जाईल, तशी कार्यकर्त्यांची घालमेल वाढत होती. शेवटच्या फेरीत ३८८ मतांची आघाडी घेऊन सत्यजित पाटील विजयी झाले.
शेट्टींची ‘शिट्टी’ गूल
लोकसभा निवडणुकीत शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघात राजू शेट्टी यांनी ४६ हजारांचे मताधिक्य घेतले होत; परंतु पक्षाच्या अधिकृत उमेदवारास एकूण मतदानांपैकी २७,९५३ एवढे मतदान पडल्याने येथून खासदार शेट्टींची ‘शिट्टी’ गूल झाली.
सत्यजित पाटील यांना पश्चिम पन्हाळ्याची साथ
सत्यजित पाटील यांचा विजय हा अल्पमतांनी झाला असून, शाहूवाडीमधून त्यांना चांगले मतदान होऊन ते आघाडीवर होते. पुन्हा पूर्व पन्हाळ्यात सत्यजित पाटील यांचे मताधिक्य कमी होऊन पश्चिम पन्हाळ्याच्या अवघ्या काही मतांवर सत्यजित पाटील यांचा विजय झाला आहे.
मतदारसंघातील विकासकामांना प्राधान्य
शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघातील औद्योगिक क्रांतीस गती देणार. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाबाबत रस्ते, वीज, पाणी या प्रश्नांना प्राधान्यक्रम देणार. येथील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
- सत्यजित पाटील, शिवसेना
पराभव खिलाडूवृत्तीने
हा पराभव आम्ही खिलाडूवृत्तीने स्वीकारला आहे. विनय कोरे सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील राजकारणाबाबत योग्य ती दिशा ठरवतील. - विजयसिंह जाधव,
जनसुराज्य शक्ती
कौल मान्य
कौल मला मान्य असून, २८ हजार मतदान करून जो विश्वास दाखविला. खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेची सेवा यापुढेही नियमित करणार.
- अमरसिंह पाटील, महायुती