निगवे खालसात सतेज पाटील-महाडिक गटातच ‘दंगल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2017 00:00 IST2017-01-20T00:00:12+5:302017-01-20T00:00:12+5:30
सौभाग्यवतींसाठी जोरदार मोर्चेबांधणी : पंचायत समितीसाठी इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग

निगवे खालसात सतेज पाटील-महाडिक गटातच ‘दंगल’
सागर शिंदे -- दिंडनेर्ली --निगवे खालसा जिल्हा परिषदेसाठी सर्वसाधारण महिला, तर निगवे व दिंडनेर्ली या दोन्ही पंचायत समितीसाठी सर्वसाधारण पुरुष असे आरक्षण पडल्याने जि.प इच्छुक उमेदवारांनी आपल्या सौभाग्यवतीसाठी जोरदार हालचाल सुरू केली आहे, तर पं. स.साठी इच्छुक असणारे स्वत: गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असून या मतदारसंघातील लढत ही सतेज पाटील व अमल महाडिक, महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रतिष्ठेची असल्याने येथे काँटे की टक्कर पहायला मिळणार आहे.
राष्ट्रवादीचा पक्षीय पातळीवरील निर्णय काहीही असला तरी खासदार धनंजय महाडिक यांची भूमिका ही सतेज पाटील यांच्या विरोधातील असणार हे निश्चितच आहे, तर मतदारसंघात शे. का. प, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना यांचे अस्तित्व आहे, पण या दोन्ही तुल्यबळ गटांच्या स्पर्धेत ते फज्जापर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे सन्मानपूर्वक युतीचे निमंत्रण आले तर ते युती करण्याची चिन्हे आहेत अन्यथा तिसरा पर्याय म्हणून समविचारी आघाडी करून जागा लढविण्याची चिन्हे आहेत.
गत जिल्हा परिषद व पं. समिती निवडणुकीत सतेज पाटील यांनी राजकारणातील डावपेच खेळीत पाचगाव जि.प. व पाचगाव पं. समितीची जागा बिनविरोध केल्याने निवडणुकीपूर्वीच पदरात पाडून घेतली होती. त्यामुळे इतर जागेवरती अधिक भर देत कोल्हापूर दक्षिणमधील एक जागा वगळता सर्वच जागांवर विजय मिळविला होता. यानंतर २0१४ च्या विधानसभा निवडणुकीत अमल महाडिक यांनी त्यांचा पराभव केल्याने मतदारसंघातील महाडिक समर्थकांना मोठे बळ मिळाले होते. विधानपरिषदेच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या विजयाने पुन्हा सतेज समर्थक उत्तेजीत झाले. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात एक चुरशीचा मतदारसंघ म्हणून हा मतदारसंघ ओळखला जातो. करवीर पंचायत समितीचे सभापतिपद असो अगर बाजार समितीचे संचालकपद असो सतेज पाटील यांनी काँग्रेस पक्षाची मोट बांधली आहे, पण काँग्रेसअंतर्गत कलहाचा धोकाही सतेज पाटील गटाला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण या गावांमध्ये सहकारी सेवा संस्था, दूध संस्था असल्याने पी. एन. पाटील यांना मानणारा वर्गही मोठा आहे. त्यामुळे पी. एन. प्रेमी गट सतेज पाटील यांनी दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी एकनिष्ठ राहणार की नाही हाही महत्त्वाचा भाग ठरणार आहे. कारण पी. एन. पाटील यांना दैवत मानणारे कित्येक प्रमुख कार्यकर्ते महाडिक गटाच्या तंबूत शिरले आहेत. त्यामुळे पी. एन. पाटील यांना मानणारा गट काँग्रेसला मदत करेल, असे दिसत नाही. काही महिन्यांपूर्वी कागलच्या शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. करवीर पूर्वमध्ये मोठ्या प्रमाणात सभासद, कामगार तसेच कारखाना पुरस्कृत पाणीपुरवठा संस्थांही आहेत. तसेच त्यांना मानणारा गटही आहे. इथून मागील घडामोडीत स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे गटाची ताकद सतेज पाटलांच्या पाठीशी लावत होते, पण आता खुद्द समरजितसिंहच भाजपमध्ये असल्याने राजे गट सतेज पाटलांच्या विरोधात प्रचाराला पुढे असतील. नगर परिषदेसारखी आपली ताकद दाखवून देण्याची समरजितसिंह यांना संधीच असणार आहे. दिंडनेर्ली पं. स. मतदारसंघातून गत निवडणुकीत काँग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादीच्या तिकिटावर संध्याराणी बेडगे लढल्या होत्या त्या भाजपच्या वाटेवर आहेत.
2012 ची जिल्हा परिषद निवडणूक
पाचगाव जि. प. मतदारसंघ (जुना) -
मनीषा संजय वास्कर (बिनविरोध -काँग्रेस)
दिंडनेर्ली पंचायत समिती मतदारसंघ -
सुवर्णा शांतिनाथ बोटे (विजयी -काँग्रेस), संध्याराणी विलास बेडगे (पराभूत -राष्ट्रवादी)
निगवे खा पंचायत समिती मतदारसंघ -
सुवर्णा संदीप गुरव (विजयी -काँग्रेस),
रत्नाबाई बाळासो रानगे (पराभूत -राष्ट्रवादी).