सरकारकडून ‘फुल ना फुलाची पाकळी’ तरीसुद्धा समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:24 IST2021-04-16T04:24:38+5:302021-04-16T04:24:38+5:30
कोल्हापूर : राज्यशासनाने लाॅकडाऊन काळात १५०० रुपये मदत अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. आजपर्यंत अशा पद्धतीने गोरगरीब रिक्षाचालकांचा ...

सरकारकडून ‘फुल ना फुलाची पाकळी’ तरीसुद्धा समाधान
कोल्हापूर : राज्यशासनाने लाॅकडाऊन काळात १५०० रुपये मदत अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. आजपर्यंत अशा पद्धतीने गोरगरीब रिक्षाचालकांचा विचार कुठल्याही सरकारने केला नव्हता. त्यामुळे मिळालेली मदत कमी असली तरी ‘फुल ना फुलाची पाकळी’ समजून आम्ही तिचा स्वीकार करू, अशी भावना रिक्षाचालकांकडून व्यक्त होत आहे. या अनुदानाचा लाभ जिल्ह्यातील १६ हजार परवानाधारक रिक्षाचालकांना मिळणार आहे.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा एक अंग असलेल्या रिक्षाचालकांचा विचार राज्य शासनाने करून एकप्रकारे आर्थिक अडचणीत सापडलेल्या रिक्षाचालकांना दिलासा दिला आहे. त्यामुळे मदत जरी थोडकी असली तरी अनेकांना ती काहीअंशी दिलासा देणारी आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या या निर्णयाचे रिक्षाचालकांतून स्वागत होत आहे. आतापर्यंत अनेक पक्षांची सत्ता राज्यात आली. मात्र, हातावरचे पोट असलेल्या रिक्षाचालकांचा विचार कुठल्याही सरकारने केला नाही. कोरोनाच्या संकटकाळात अडचणीत आलेल्या रिक्षाचालकांचा विचार उद्धव ठाकरे सरकारने केला. त्यामुळे त्यांनी जी १५०० रुपयांची मदत देऊ केली आहे. ती रक्कम जरी कमी असली तरी ती आमच्यासारख्या गोरगरीब रिक्षाव्यावसायिकांना मोठी दिलासा देणारी ठरणारी आहे. अशी भावना अनेक रिक्षाचालकांनी व्यक्त केली.
चौकट
जिल्ह्यात परवानाधारक रिक्षाचालक संख्या -१६०००
व्यवसायावर निर्भर संख्या : लाखोंच्या घरात
कोट
आतापर्यंत कुठल्याही सरकारने रिक्षा व्यावसायिकांचा विचार केलेला नव्हता; परंतु या सरकारने १५०० रुपयांची का होईना मदत देऊन एकप्रकारे अडचणीच्या काळात मदतीचा हात दिला आहे. हा विसरण्यासारखा नाही.
-चंद्रकांत भोसले,
रिक्षाचालक व अध्यक्ष महाराष्ट्र रिक्षा वाहतूक सेना
कोट
अनुदानाची रक्कम कितीही असु दे. मात्र, ती आमच्यासारख्या हातावरचे पोट असलेल्या रिक्षाचालकांचा काही अंशी रोजीरोटीचा प्रश्न मिटला आहे. मदत कमी असली तरी दिलासा देणारी आहे.
- विजय गायकवाड, रिक्षाचालक
कोट
लाॅकडाऊनच्या काळात ही मदत लाखमोलाची आहे. त्यामुळे सरकारकडून अपेक्षा मोठ्या असल्या तरी त्यांनी देऊ केलेली मदत चांगलीच आहे.
- दत्तात्रय साळोखे, रिक्षाचालक, लाड चौक रिक्षा मंडळ