सतेज, संभाजीराजेंचा वाढता सलोखा

By Admin | Updated: September 1, 2016 00:40 IST2016-09-01T00:26:15+5:302016-09-01T00:40:37+5:30

बदलले राजकीय संदर्भ : राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा

Satej, SambhajiRaje's growing reconciliation | सतेज, संभाजीराजेंचा वाढता सलोखा

सतेज, संभाजीराजेंचा वाढता सलोखा

कोल्हापूर : काँग्रेसचे आमदार व माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांचा राष्ट्रपती नियुक्त खासदार संभाजीराजे यांच्याशी वाढता सलोखा जिल्ह्णांत चर्चेचा विषय बनला आहे. सतेज पाटील हे आगामी खासदारकीची निवडणूक डोळ््यांसमोर हा सलोखा वाढवत असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी (दि. २) या दोघांच्या उपस्थितीत ‘एसपीएन वृत्तवाहिनी’चा विधायक गणेशोत्सव बक्षीस समारंभ होत आहे.
संभाजीराजे यांची भाजप सरकारने खासदार म्हणून नियुक्ती केली असली तरी त्यांनी थेट पक्षाचे लेबल लावून घेण्यास नकार दर्शविला आहे. त्यांची आजही भूमिका खासदारकीपेक्षा आपण ‘शिव-शाहूंचे वारसदार’ हाच बहुमान मोठा असल्याची आहे. गेल्या पंधरवड्यात कोल्हापुरात झालेल्या नागरी सत्कार सोहळ््यातही त्यांनी त्यावरच भर दिला आहे. खासदार झाल्यापासून या दोघांचे किमान चार ते पाच वेगवेगळे कार्यक्रम एकत्रित झाले आहेत. परवाच शिवाजी ट्रेक झाला तेव्हाही ते एकत्र होते. त्यानंतर त्या दोघांची छायाचित्रांसह ही जिल्ह्णाच्या विकासाची नवी दौड असल्याचे संदेश सोशल मीडियावर फिरले.
संभाजीराजे यांच्या नागरी सत्कार सोहळ््यास सतेज पाटील उपस्थित नव्हते; परंतु खासदार धनंजय महाडिक हे आवर्जून उपस्थित होते. तेथील संभाजीराजेंच्या भाषणाची जोरदार चर्चा झाली. खासदार महाडिक यांना त्यांनी कोल्हापूरच्या विकासासाठी तुमच्यापेक्षा काकणभर जास्त कष्ट घेण्याची तयारी असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. या दोघांना लोकसभेला व विधानसभेला महाडिक गटाच्या विरोधामुळे झालेला पराभव हा एकत्र येण्यास समान दुवा मिळाला आहे. २००९ च्या लोकसभेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने धनंजय महाडिक यांना डावलून संभाजीराजे यांना उमेदवारी दिल्यावर महाडिक गटाने त्या नाराजीतून खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या मागे बळ लावले. त्यामुळे मंडलिक यांचा विजय सुकर झाला. महाडिक यांच्या लोकसभेला सतेज पाटील यांनी मदत केली परंतु २०१४ च्या विधानसभेवेळी मात्र कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून खासदार महाडिक यांनी सतेज पाटील यांच्या विरोधात प्रचार केला. त्याचा फटका त्यांना बसला. महाडिक यांनी गनिमी कावा करून आपला पराभव केल्याचे शल्य या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांत आहे. आगामी लोकसभेपर्यंत अजून पुलाखालून बरेच पाणी वाहून जाणार आहे. खासदार संभाजीराजे यांची पावले ओळखून खासदार महाडिक हे देखील दक्ष झाले आहेत. जिल्हा परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणून सत्ता काबीज करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. राष्ट्रवादीतून आतापर्यंत ते फटकून होते; परंतु आता ते ही पक्षात आक्रमकपणे सक्रिय झाले आहेत. या सगळ््या घडामोडींत शिवसेनेचे संजय मंडलिक यांची दिशा काय राहील ही उत्सुकता आहे.


लोकसभेच्या निवडणुकीला अजून बराच अवधी आहे; परंतु ती डोळ््यांसमोर ठेवून काही घडामोडी आतापासूनच सुरू झाल्या आहेत. ‘शत्रूचा शत्रू, तो आपला मित्र’ या न्यायाने सतेज पाटील हे संभाजीराजे यांच्या खासदारकीला बळ देऊ लागले आहेत. विमानतळाच्या संरक्षक भिंतीसाठी १६ कोटींचा निधी मंजूर झाल्यावर खासदार महाडिक यांनी आपल्या प्रयत्नांमुळे हे झाल्याचे जाहीर केले. त्यास लगेच स्वत: संभाजीराजे यांनी काहीच उत्तर दिले नाही परंतु सतेज पाटील यांनी निवेदन प्रसिद्धीस देऊन हा निधी मंजूर होण्यासाठी खासदार संभाजीराजे यांचेही प्रयत्न कारणीभूत झाल्याचे सांगितले.

Web Title: Satej, SambhajiRaje's growing reconciliation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.