सतेज पाटील यांची वक्तव्ये वैफल्यातून
By Admin | Updated: May 13, 2015 00:52 IST2015-05-13T00:03:08+5:302015-05-13T00:52:43+5:30
धनंजय महाडिक यांचे प्रत्युत्तर : पाचगावचा पाणीप्रश्न आम्हीच सोडविला; महाडिकांच्या क्षमतेवर बोलणे हास्यास्पद

सतेज पाटील यांची वक्तव्ये वैफल्यातून
कोल्हापूर : विधानसभेसह गोकुळ व राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत जनाधार गेल्यानेच सतेज पाटील वैफल्यातून वक्तव्ये करत असल्याचे प्रत्युत्तर खासदार धनंजय महाडिक यांनी दिले आहे. रविवारी पाचगावच्या पाणी योजना पायाभरणी कार्यक्रमात खासदार महाडिक यांनी पाटील यांच्यावर टीका केली. त्यावर सोमवारी सतेज पाटील यांनी महाडिक नावांवर निवडून येऊन दाखवा असे आव्हान दिले. त्यावर महाडिक यांनी हे प्रत्युत्तर दिले आहे. निवेदनात म्हटले आहे, ‘लोकसभा निवडणुकीत देशात वेगळी परिस्थिती असताना, कोल्हापूरच्या सुज्ञ जनतेने खासदार म्हणून संधी दिली. जनसेवेचे फळ म्हणूनच जनता पाठीशी राहिली. असे असताना, स्वत:चे महत्त्व वाढविण्यासाठी काहीजण मदतीचा डांगोरा पिटत आहेत. खुनशी आणि द्वेषाचे राजकारण करणाऱ्या सतेज पाटील यांना जनतेने खड्यासारखे बाजूला टाकले. सर्वच ठिकाणी पराभव स्वीकारावा लागल्याने, वैफल्यग्रस्त झालेल्या सतेज पाटील यांनी, पक्ष सोडून निवडून दाखवा, असे बालीश वक्तव्य केले आहे. टीका करण्यापूर्वी २००४ साली त्यांना राजकारणात कुणी आणले, याचा विचार करावा. महाडिक गटाचा उमेदवार म्हणून विधानसभेत प्रवेश केलेल्यांनी आता महाडिकांच्या क्षमतेवर बोलणे हास्यास्पद आहे.
पाचगाव पाणीपुरवठा योजनेसाठीची तांत्रिक मान्यता १९ डिसेंबर २०१४ रोजी, तर प्रशासकीय मान्यता २ जानेवारी २०१५ रोजी मिळाली आहे. या कालावधीत सतेज पाटील आमदार नव्हते. तरीही खोटे बोलण्याची आणि स्वत:चे महत्त्व वाढविण्यासाठी वाटेल ते वक्तव्य करण्याची सवय असल्याने, आपणच पाचगावची पाणीपुरवठा योजना मंजूर केल्याचे ते सांगत आहेत; पण सुज्ञ जनता सर्वकाही जाणते.
खासदार म्हणून जिल्ह्याचे प्रश्न मांडण्यासाठी दिल्लीवारी करताना, स्वत:चे हेलिकॉप्टर नसल्याने, विमानाचा वापर करावा लागतो; पण मंत्रिपदावर असताना सतेज पाटील यांचा अनिर्बंध हेलिकॉप्टरचा वापर जनतेने पाहिला. म्हणून जनतेनेच त्यांना जमिनीवर उतरविले. अशा परिस्थितीतही आत्मचिंंतन करण्याऐवजी महाडिकांवर टीका करण्यातच ते धन्यता मानत
आहेत.
खासदार म्हणून जिल्ह्याचे सर्व प्रश्न लोकसभेच्या अधिवेशनाच्या कालावधीत उपस्थित केले आहेत. संबंधित खात्याच्या केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा केल्याने त्याला यश येऊ लागले आहे. त्यामुळे सतेज पाटील यांना पोटशूळ उठला आहे. सर्वच पातळ्यांवर पराभूत झाल्याने, सतेज पाटील यांच्याकडे कोणतेच काम उरलेले नाही. त्यांच्या बाष्कळ वक्तव्यांकडे दुर्लक्ष करून, सर्वसामान्यांसाठी कार्यरत राहण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.
आत्मीयतेमुळे अमल महाडिक आमदार
अमल महाडिक हे कोणत्या लाटेवर नव्हे, तर महाडिक कुटुंबीयांबद्दलची सर्वसामान्यांची आत्मीयता आणि पाटील यांच्या विरोधातील रोषामुळे आमदार झाले. त्यांनी गेल्या सहा महिन्यांत पाचगाव पाणी योजना मंजूर करून आणली. दक्षिण मतदारसंघातील रस्त्यांसाठी १८ कोटी रुपयांचा निधी आणला.