सतेज पाटील यांचा सरकारी जागांवर दरोडा
By Admin | Updated: April 11, 2015 00:24 IST2015-04-11T00:18:05+5:302015-04-11T00:24:59+5:30
महाडिक यांचा पलटवार : ‘गोकुळ’वर शिंतोडे उडवू नका...

सतेज पाटील यांचा सरकारी जागांवर दरोडा
कोल्हापूर : ‘गोकुळ’वर हलगी वाजवून आम्ही दरोडा घातला म्हणणाऱ्यांनी देवस्थान व महापालिकेच्या जागांवर हलगी वाजवून दरोडा घालून साम्राज्य उभे केल्याचा पलटवार आमदार महादेवराव महाडिक यांनी पत्रकार परिषदेत केला. जागतिक पातळीवर नावलौकिक मिळविलेल्या ‘गोकुळ’वर शिंतोडे उडविणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. यात तुम्ही भस्मसात व्हाल. आरोप करणाऱ्यांनी एका व्यासपीठावर यावे, असे उघड आव्हानही त्यांनी दिले.
‘आमदार महाडिक यांनी ‘गोकुळ’वर हलगी वाजवून १५० कोटींचा दरोडा घातल्या’चा आरोप गुरुवारी सतेज पाटील यांनी केला होता. याला उत्तर देण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी ‘गोकुळ’च्या ताराबाई पार्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार महाडिक बोलत होते. ते म्हणाले, आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी संस्था कशा निर्माण केल्या? महापालिका, देवस्थानच्या जागा हडप करणाऱ्यांनी एका व्यासपीठावर येऊन बोलावे. कोण किती पाण्यात आहे, हे माहीत आहे. कदमवाडी येथील हॉस्पिटलची जागा, नवीन पंचतारांकित हॉटेलची जागा, कसबा बावड्यातील कॉलेजसाठी साडेसात एकरांऐवजी दहा एकर जागा घेतली. विद्यापीठाशेजारील नवीन कॉलेजची जागा महापालिकेकडून कशी घेतली? करार संपूनही वॉटर पार्क ताब्यात कसा? कोल्हापूरपासून मुंबईला जाईपर्यंत या मंडळींचे अनेक प्रताप उघड होतील. मी उकिरडा उकरणार नाही. माझ्या राज्यात मी खूश आहे. ‘गोकुळ’मध्ये टॅँकर नियमानेच येतात-जातात. तसे होत नसेल तर जनता देईल ते शिक्षा भोगण्यास तयार आहे. शेतकऱ्यांच्या बळावर संघाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे. त्याच्यावर विनाकारण शिंतोडे उडवू नका. स्वत:च्या कारखान्याच्या सभासदांनाही आपण सभासद आहोत की नाही, हे माहीत नाही, अशा मंडळींनी आमच्या कारखान्याची मापे काढू नयेत. खोटे आरोप केल्याने सत्य झाकोळले जात नाही. महाडिक भिणारा नाही आणि मैदान सोडणारा नाही. ‘राजाराम’ व ‘गोकुळ’चा निकालच विरोधकांना उत्तर देईल, असेही आमदार महाडिक यांनी सांगितले. यावेळी अध्यक्ष दिलीप पाटील, अरुण नरके, रणजितसिंह पाटील, विश्वास पाटील, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर उपस्थित होते.
आताच पुळका कसा?
आॅडिट दरवर्षी होत असते. विरोधकांना आताच ‘गोकुळ’चा पुळका कसा आला? या अगोदर ते गप्प का होते? असा सवाल करीत अमल महाडिक व रामराजे संचालक मंडळात दिसले असते, असे म्हणणे म्हणजे ‘झोपाळा खाली पडला; त्याखाली बाळ असते तर?’ असे म्हणण्यासारखे आहे, अशी खिल्ली अरुण नरके यांनी उडविली.
आइस फॅक्टरीवर मौन
कोल्हापूर आइस फॅक्टरी कोणाची, याबाबत विचारले असता, आमदार महाडिक यांच्यासह संचालकांनी मौन पाळले. ही फॅक्टरी कोणाची हे आरोप करणाऱ्याला विचारा, अशा एकेरी भाषेत अध्यक्ष दिलीप पाटील यांनी उत्तर दिले.
झोप चुकवत नाही...!
नित्यनियमाने दुपारची झोप घेणाऱ्यांची झोप उडाल्याची टीका सतेज पाटील यांनी केली होती. यावर बोलताना, माझी झोप उडालेली नाही. आजही दुपारचे झोपूनच आलो आहे. माझ्या झोपेची काळजी इतर कोणी करू नये, असे प्रत्युत्तर आमदार महाडिक यांनी दिले.