समीर देशपांडेकोल्हापूर : एकीकडे कागल-सातारा सहापदरीकरणाच्या कामाची पूर्तता झालेली नाही. दोन्ही टप्प्यांच्या कामाला संबंधित कंपन्यांनी मुदतवाढ मागितलेली आहे. अनेक कामे अपूर्ण आहेत. सेवा रस्त्यातील खड्डे तसेच आहेत. प्रवासाला पहिल्यापेक्षा खूपच वेळ जात आहे. मग टोल कशाला घेता अशी विचारणा वाहनधारक करत आहेत. काम पूर्ण होईपर्यंत टोल तरी घेऊ नका अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.गेली दोन वर्षे कागल, सातारा महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू आहे; परंतु कागल ते पेठ नाका हे काम निम्मेही झालेले नाही. शेंद्रा फाट्यापर्यंत अनेक ठिकाणी पुलांची कामे संथगतीने सुरू आहेत. कोल्हापूरजवळच्या पुलाची शिरोली येथील प्रस्तावित पुलाची रचनाच आता बदलल्याने किमान अडीच वर्षे इथले काम मार्गी लागणार नाही. कागल ते पेठ नाका या कामापेक्षा कराड पुलाचे काम मोठे असूनही पेठ नाका ते शेंद्रा फाटा या सहापदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे.परंतु सेवा रस्त्यांचा दर्जा खराब आहे. सहापदरीकरण झालेल्या रस्त्यावरही मध्येच जोरात दणके बसतात. या सगळ्यामुळे वेगही घेता येत नाही. कोल्हापूरहून पुण्याला जायला सहा तास लागत आहेत. आता पावसाळ्यात तर वाहनधारकांचे आणखी हाल. नेतेमंडळींना वाहनधारकांच्या या दुखण्याकडे पाहण्यासाठी लक्ष नाही. विलंब का झाला विचारायला जावे तर अनेक लोकप्रतिनिधी, जनता यांच्या मागणीनुसार पूल वाढवले आहेत. रचना बदलल्या आहेत. त्यामुळे मूळ कामात बदल केल्यामुळे विलंब होत आहे असे सांगण्यात येत आहे.ही वस्तुस्थिती असली तर यामुळे वाहनधारकांचे हाल संपत नाहीत हे देखील वास्तव आहे. उत्तम रस्त्यासाठी म्हणून जर वाहनधारकांकडून टोल घेतला जात असेल तर रस्ता उत्तम झाल्यानंतरच टोल घ्यावा. तोपर्यंत टोल माफ करावा. नाहीतरी कंपनीला अपेक्षित टोल उत्पन्न मिळाले नाही तर टोलसाठी मुदतवाढ दिलीच जाते. तर मग खराब रस्त्यांसाठी टोल काय द्यायचा हा खरा प्रश्न आहे.
तर रस्त्यावर उतरावे लागेलकोल्हापूर-सातारा रस्त्याच्या सहापदरीकरणाच्या कामाला विलंब लागत आहे. त्याचा फटका नेहमी आम्हाला मुंबईला जाताना बसतो. वाहनधारकांचे काय हाल होतात हे आम्ही प्रवासात पाहत असतो. असे असूनही टोल वसुली मात्र अखंडपणे सुरू आहे. आमची शासनाकडे मागणी आहे की जोपर्यंत सहापदरीकरण पूर्ण होऊन रस्ता वाहतुकीसाठी खुला होत नाही तोपर्यंत टोल घेऊ नका. यासाठी आता शिवसेना वेळ पडली तर रस्त्यावरही उतरणार आहे. - संजय पवार, उपनेते, उद्धवसेना
इतक्या प्रदीर्घ कालावधीत आम्ही टोल का देत आहोत हेच कळत नाही. वेळ, इंधन, वाहन, शरीर यांची अक्षम्य हेळसांड करत केला जाणारा हा प्रवास. किमान रस्ता पूर्ण होईपर्यंत टोलमुक्त असायला हवा. एका महत्त्वाच्या विषयावर ‘लोकमत’ सातत्याने लिहीत आहे त्याबद्दल आभार. - समीर परुळेकर
ज्या ठिकाणी रस्ते जोडले आहेत त्या ठिकाणी गाड्या उडतात. काही ठिकाणी रस्ता निमुळता होत जातो. तिथे कोणतेही दर्शक नाहीत. खूप धोकादायक प्रकार आहे सगळा. - प्रसाद जमदग्नी
‘लोकमत’ने खूप ज्वलंत प्रश्न मांडला आहे त्याबद्दल वाचकांच्या वतीने आभार. लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या ज्या भावना ‘लोकमत’ने मांडल्या आहेत. त्या समजून त्यावर कार्यवाही करावी. - शिवाजी जनवाडे