सातारा महाविद्यालय परिसर चिडीचूप..! लोकमतचा दणका ‘लोकमत’ चे आभार
By Admin | Updated: August 25, 2014 22:13 IST2014-08-25T21:18:02+5:302014-08-25T22:13:01+5:30
पोलिसांची नजर : टोळीने फिरणाऱ्यांवर कारवाई; विद्यार्थिनी झाल्या निर्भय

सातारा महाविद्यालय परिसर चिडीचूप..! लोकमतचा दणका ‘लोकमत’ चे आभार
सातारा : महाविद्यालयीन परिसरात तरूणींची छेडछाड करणाऱ्या टोळक्याचा बंदोबस्त करण्याचा विडा आता पोलिसांनीही उचलला आहे. महाविद्यालय सुरू झाल्यापासून संपेपर्यंत पोलीस तैनात असल्यामुळे नेहमी गजबजलेला असणारा महाविद्यालय परिसर सोमवारी एकदम चिडीचूप होता. पोलिसांनी टोळक्याने फिरणाऱ्या विद्यार्थ्यांवर दंडात्मक कारवाई केली.
गेल्या काही महिन्यांपासून रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी महाविद्यालय परिसरात विद्यार्थी, विद्यार्थिनींना त्रास देण्याचे प्रकार सुरू होते. याविषयी वेळोवेळी सांगूनही दखल घेतली जात नसल्याने काही युवकांनी याविषयी ‘लोकमत’कडे तक्रार केली. याविषयी सत्यता पडताळून समोर आलेले वास्तव ‘लोकमत’ने मांडले.
विद्यार्थी-विद्यार्थिनींवर अर्वाच्च शेरेबाजी करणे, क्षुल्लक कारणावरून मारामारी करणे यांसारखे अनेक प्रकार गेल्या काही दिवसांत घडत होते. याविषयी वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले. संबंधित युवकांची दहशत मोडून काढायची असेल तर सर्वांनीच एकीने त्यांना विरोध करायला शिकले पाहिजे, असा सूर समाजातील विविध स्तरांतून उमटू लागला.
या पार्श्वभूमीवर, सोमवारी महाविद्यालय परिसरात साध्या वेशातील आणि गणवेशातील पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या समोर असणाऱ्या हॉटेलच्या मागील बाजूस धूम्रपान करणाऱ्या काही अल्पवयीन मुलांना पोलिसांनी चांगलाच ‘प्रसाद’ दिला. अचानक उद्भवलेल्या या प्रसंगामुळे मुलांमध्ये एकच गोंधळ उडाला.
धूम्रपान करणाऱ्यांबरोबरच टोळीटोळीने फिरणारे विद्यार्थीही आज पोलिसांच्या नजरेतून सुटले नाहीत. कारणाशिवाय नुसत्या गाड्या उडविणाऱ्या मुलांनाही आज पोलिसी खाक्याचे दर्शन घडले.
गेल्या काही महिन्यांपासून दहशतीखाली वावरणाऱ्या तरूणींनी सुटकेचा नि:श्वास सोडला. आता महाविद्यालयात येताना किंवा बाहेर पडताना कुठलेच दडपण जाणवत नाही, अशी प्रतिक्रिया तरूणींनी दिली. (प्रतिनिधी)
टोळीने दिला ‘विधायक कामाचा शब्द’
समाजातून वाढणाऱ्या दबावामुळे अखेर संबंधित टोळीतील मुलांनी ‘लोकमत’ कार्यालयात येऊन दिलगिरी व्यक्त करत, ‘यापुढे आम्ही असं करणार नाही,’ अशी शपथ घेतली. ‘भविष्यात तरूणींचा सन्मान राखणं आणि विनाकारण कोणाशीही वाद निर्माण न करणं हा शुध्द हेतू ठेवून वावरणार,’ असा शब्दही त्यांनी दिला. ‘यापुढे आमची कोणतीही तक्रार तुमच्याकडे येणार नाही असेच राहू,‘ असा निश्चय करून या टोळीने विधायक सामाजिक कार्य करून मदतीची भूमिका निभावण्याची प्रतिज्ञा केली आहे.
महाविद्यालय परिसरात अचानक उभे राहिलेले पोलीस पाहून अनेक विद्यार्थ्यांना आश्चर्य वाटले. काहींनी सुटकेचा नि:श्वास सोडला तर कोणी भयंकर तणावाखाली आहे. मुलांचे बदललेले चेहरे पाहून पोलिसांनी त्यांना अडविले. यातील काही मुलांच्या बॅगा तपासल्या असता त्यात कोऱ्या वह्या आढळून आल्या. महाविद्यालयात सहज प्रवेश मिळविण्यासाठी ‘सॅक’ अडकवून येणाऱ्यांना पोलिसांनी दम देऊन आवारातून बाहेर काढले.
‘लोकमत’ चे आभार
झुंडशाहीने सुरू असलेल्या टोळीच्या बेलगाम वर्तनावर लेखणीचा आसूड उगारणाऱ्या ‘लोकमत’च्या भूमिकेचे विद्यार्थिनींनी विशेष कौतुक केले. ‘लोकमत’ने लक्ष घातल्यामुळेच तरूणींना या जाचातून सुटका मिळाली. आता महाविद्यालयात येताना आम्हाला कसलेच दडपण जाणवणार नाही. ‘लोकमत’ने पालकत्वाची भूमिका घेऊन हा प्रश्न तडीस नेल्याबद्दल आम्ही ‘लोकमत’चे आभारी आहोत, असेही तरूणींनी नमूद केले.