सतेज पाटील-महादेवराव महाडिक आमनेसामने
By Admin | Updated: January 2, 2015 00:18 IST2015-01-01T23:39:51+5:302015-01-02T00:18:01+5:30
दोन्ही गटांकडून मोर्चेबांधणी : राजाराम साखर कारखाना, श्रीराम सेवा संस्थेच्या निवडणुकीची तयारी

सतेज पाटील-महादेवराव महाडिक आमनेसामने
रमेश पाटील - कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची मे महिन्यात, तर श्रीराम विकास सेवा संस्थेची जून-जुलैमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही संस्थांसाठी बावड्यातील इच्छुकांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून आमदार महादेवराव महाडिक व माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या भेटी इच्छुक घेत आहेत.
राजाराम साखर कारखान्याची निवडणूक गळीत हंगाम संपल्यानंतर म्हणजेच मे महिन्यात होण्याची चिन्हे आहेत. विद्यमान संचालक मंडळात बावड्यातील तीन संचालक आहेत. नवीन सहकार नियमानुसार संचालक मंडळाची संख्या १९ इतकी राहणार आहे. त्यामुळे आगामी पॅनेलमध्ये बावड्यातील कितीजणांना संधी मिळते याची उत्सुकता आहे. पॅनेलमध्ये संधी मिळावी म्हणून बावड्यातील काहीजण आमदार महादेवराव महाडिक यांच्या संपर्कात आहेत. आमदार महाडिक यांनी मात्र अद्याप कोणालाही पॅनेलमध्ये घेतो, असा शब्द दिलेला नाही.
दरम्यान, श्रीरामची निवडणूक लढविण्यासाठी बावड्यातील अनेक तरुणांना गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या पॅनेलमध्ये निवडणूक लढवायची आहे. त्यासाठी ते पाटील यांच्या संपर्कात आहेत. गेली काही वर्षे माजी गृहराज्यमंत्र्यांच्या ताब्यात ही संस्था आहे. या दोन्ही संस्थांच्या निवडणुकांना अजून अवधी असला तरी इच्छुकांचा सार्वजनिक कार्यक्रमातील सहभाग लक्षणीय ठरत आहे.
राजाराम कारखान्याच्या निवडणुकीबाबत माजी गृहराज्यमंत्र्यांचा गटही आक्रमक झाला आहे. राजाराम कारखाना बचाव संघर्ष समितीच्यावतीने सोमवारी विविध मागण्यांचे निवेदन कारखाना व्यवस्थापनाला देऊन तयारीची ‘झलक’ दाखविली. त्यामुळे ‘राजाराम’च्या निवडणुकीत रंगत येण्याची शक्यता आहे.
श्रीराम संस्थेच्या निवडणुकीसाठी ही चुरस आहे. १६ मे २०१५ रोजी श्रीरामच्या विद्यमान संचालकांची मुदत संपते. त्यानंतर कच्च्या याद्या, पक्क्या याद्या, निवडणूक कार्यक्रम आणि मतदान या सर्वांसाठी मिळून ४० दिवसांचा अवधी लागतो.
श्रीरामची निवडणूक जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. मुदतवाढ जर मिळाली, तर आॅक्टोबरमध्ये सुद्धा निवडणूक होऊ शकते.