सासू-सुनांची रंगली मैत्रीपूर्ण जुगलबंदी
By Admin | Updated: December 23, 2015 01:24 IST2015-12-23T00:45:19+5:302015-12-23T01:24:38+5:30
‘कलर्स’, लोकमत सखी मंच प्रस्तुत ‘सासू-सून जोडी नं.१’ ला प्रतिसाद; कुलकर्णी, माने, उपासे, राऊत, सुतार विजयी

सासू-सुनांची रंगली मैत्रीपूर्ण जुगलबंदी
कोल्हापूर : लोकमत ‘सखी मंच’ आणि ‘कलर्स’ प्रस्तुत ‘सासू-सून जोडी नंबर १’ या सासू-सुनांतील नात्यांचे पदर व अंतरंग उलगडून दाखविणाऱ्या स्पर्धेला सखींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यानिमित्त आयोजित स्पर्धेत विद्या व अनुष्का कुलकर्णी, अरुणा-सविता माने, अरुणा आणि जयश्री उपासे, शोभा आणि समृद्धी राऊत, कल्पना आणि लक्ष्मी सुतार या जोड्यांनी अव्वल यश मिळविले.
या स्पर्धेत एकूण आठ सासू-सुनेच्या जोड्यांनी भाग घेतला होता. पहिल्या फेरीत खेळीमेळीच्या वातावरणात कवितांच्या माध्यमातून सासूंनी सुनांची ओळख करून दिली, तर दुसऱ्या फेरीत ‘मॅचिंग राऊंड’ झाला. त्यामध्ये अगदी कर्णफुलापासून चप्पल, पर्स, साडी आदींचे एकसारखे मॅचिंग सासू-सुनांनी केले होते.
तिसऱ्या फेरीत सासू आणि सुना किती बुद्धिमान आहेत, त्याची चुणूक व्यासपीठावर दाखविण्याची संधी देण्यात आली. त्यानुसार अनेकांनी आपल्यातील सुप्त बुद्धिमत्तेचे प्रदर्शन घडविले. चौथी फेरी परीक्षक राऊंड म्हणून घेण्यात आली. त्यामध्ये सासू-सुनांच्या मनातील भाव समजून घेण्यासाठी त्यांच्या विचारांची पातळी किती प्रलग्भ आहे, याची जणू परीक्षा घेणारीच ठरली.
सासू-सुनेच्या नातेसंबंधात अनेक पैलू असतात. सासू म्हणजे कजागच तर सुनाही काही कमी नसतात, अशा सासू-सुनेच्या भांडखोर छटा छोट्या पडद्याद्वारे आणि चित्रपटांतून दाखविल्या जात असल्या तरी सासू कधी आई असते, बहिणीसारखी साथ देणारी असते. नव्या जमान्यात तर आई-मुलीसारखे नाते असणाऱ्या सासू-सुनेच्या जोड्याही पाहायला मिळतात. याच सगळ्या नात्यांचे पदर उलगडून दाखविणाऱ्या ‘सासू-सून जोडी नं. १’ या कार्यक्रमातून शनिवारी व्ही. टी. पाटील स्मृतिभवनात उपस्थित सखींना सासू-सुनांच्या नात्यातील छटा पाहण्यास मिळाल्या.
जीवनाचे अनेक रंग दाखविणारे कौटुंबिक चॅनेल ‘कलर्स’ व स्त्रियांच्या कला-गुणांना व्यासपीठ देणारे हक्काचे व्यासपीठ लोकमत ‘सखी मंच’ने आयोजित केलेल्या या कार्यक्रमातून नात्यातील अनेक रंगांचे वैविध्यपूर्ण दर्शन घडविणारा ‘सासू-सून जोडी नं. १’ हा कार्यक्रम म्हणजे सासू-सुनांच्या नात्यातला दुवा ठरला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्या सुविद्य पत्नी शांतादेवी डी. पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. वारणा वडगावकर यांनी कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन केले. या स्पर्धेचे परीक्षण अॅड. गीता भूमकर, चाटे स्कूलच्या प्राचार्या ऋचा कुलकर्णी यांनी केले, तर स्पर्धेचा बक्षीस समारंभ परीक्षकांच्या हस्ते झाला. (प्रतिनिधी)
आठ जोड्यांचा सहभाग
विद्या-अनुष्का कुलकर्णी, अरुणा-सविता माने, कल्पना-लक्ष्मी सुतार, अक्षता-वैशाली शहा, अश्विनी-शीला हंजे, अरुणा-तेजश्री उपासे, समृद्धी-शोभा राऊत, हौसाबाई-प्रतीक्षा वंदुरे-पाटील या जोड्यांनी भाग घेतला होता. त्यात कुलकर्णी, माने, सुतार, उपासे, राऊत यांनी बाजी मारली.
‘डी डान्स झोन’च्या कलाविष्काराची झालर
विशाल पाटील यांच्या ‘डी डान्स झोन’चे मेघा माळी, प्रीती काशीद, अमृता चेचर, आम्रपाली कांबळे, करिश्मा चिरमुरे, अमोल तावरे, नीलेश शिंदे, अक्षय जाधव, प्रकाश माने, देवानंद सुतके यांनी हिंदी-मराठी गाण्यांवर ‘नटरंग’, ‘शेतकरी नृत्य’, ‘ढिपांगी ढिपांग...’ , ‘नवरी माझी लाडाची लाडाची गं...’ ‘जोगवा’, ‘वाजले की बारा...’ या गीतांवर नृत्ये सादर करत सखींना डोलावयास भाग पाडले.
लकी ड्रॉद्वारे पैठणी
कार्यक्रमानिमित्त सर्व सखींमधून जमा केलेल्या कुपनमधून काढण्यात आलेल्या लकी ड्रॉमध्ये सखी पद्मा बहिरशेट या पैठणीच्या विजेत्या ठरल्या. बहिरशेट यांना परीक्षक अॅड. गीता भूमकर यांच्या हस्ते पैठणी देण्यात आली.